सावधान ! जिल्ह्यात सातत्याने होत आहे रुग्णवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:35 AM2021-09-04T04:35:06+5:302021-09-04T04:35:06+5:30
गोंदिया : मोजक्या एका क्रियाशील रुग्णावर आलेल्या जिल्ह्यात आता पुन्हा सातत्याने रुग्णवाढ होताना दिसत आहे. हेच कारण आहे की, ...
गोंदिया : मोजक्या एका क्रियाशील रुग्णावर आलेल्या जिल्ह्यात आता पुन्हा सातत्याने रुग्णवाढ होताना दिसत आहे. हेच कारण आहे की, आता जिल्ह्यातील तीन तालुक्यांत कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून क्रियाशील रुग्णसंख्या ५ एवढी झाली आहे. हे धोक्याचे संकेत असल्याने जिल्हावासीयांनी अनर्थ टाळण्यासाठी खबरदारीने वागण्याची गरज दिसून येत आहे.
कोरोनाची दुसरी लाट आली असता जिल्हावासीयांनी संयमाने घेतले व दुसरी लाट परतावून लावण्यात यश आले. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात होती व क्रियाशील रुग्णसंख्या मध्यंतरी एकावर आली होती. त्यानंतर मात्र कोरोना आता गेला या संभ्रमात नागरिकांनी कोरोनाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले. आता हेच कारण म्हणता येईल की, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रुग्ण आढळून येत असल्याने क्रियाशील रुग्णसंख्या वाढून आता ५ एवढी झाली आहे. पहिल्या लाटेचा जोर ओसरल्यावर नागरिकांनी कोरोना गेला या संभ्रमात राहून चांगलाच अतिरेक केला होता. मात्र, त्यानंतर दुसऱ्या लाटेने कहर केला व हा कहर पहिल्या लाटेपेक्षा जास्त होता. त्यात आता तिसऱ्या लाटेबाबत इशारा दिला जात असून खबरदारीने वागण्याबाबत सांगितले जात आहे. त्यात जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने हेच संकेत समजून नागरिकांनी आता पुन्हा जरा जपूनच वागण्याची गरज निर्माण झाली आहे.
-------------------------------
ग्रामीण भागात पुन्हा शिरकाव
आतापर्यंत आलेल्या दोन लाटांमध्ये गोंदिया तालुका हॉटस्पॉट होता व त्यातही गोंदिया शहराला कोरोनाने जास्त प्रमाणात झळ पोहोचविली आहे. मात्र, सध्या दिसून येत असलेल्या स्थितीत आमगाव, सालेकसा व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात क्रियाशील रुग्ण दिसून येत आहेत. म्हणजेच, ग्रामीण भागात कोरोना पाय पसरत असल्याने यातून जिल्हावासीयांनी समजून घेण्याची गरज आहे.
----------------------------------
लसीकरण करवून घ्या
जिल्ह्यात लसीकरण जोमात सुरू असून असे असतानाही ग्रामीण भागात मात्र आजही नागरिक लसीकरणाला हुलकावणी देत असताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचे आताच दिसून येत आहे. त्यामुळे शहरी असो वा ग्रामीण भाग प्रत्येकानेच लस घेऊन स्वत:ला व कुटुंबाला सुरक्षित करून घेण्याची गरज आहे.