दिवाळीची ऑनलाइन खरेदी करताना काय काळजी घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 03:55 PM2024-10-16T15:55:59+5:302024-10-16T15:58:14+5:30
Gondia : बनावट लिंकवरून खरेदी केली तर होऊ शकते फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळीचा सण आता तोंडावर येऊ लागला आहे. या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. सध्या ऑनलाइनखरेदी वाढली असून, त्यात फसवणुकीचा धोकाही वाढू लागला आहे.
मागील काही वर्षांमध्ये ऑनलाइन खरेदीचे प्रकार वाढले आहेत. दिवाळीमध्ये ऑनलाइन खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात. त्यामुळे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन खरेदी केली जाते. परंतु, ही खरेदी करीत असताना कोणत्या साइटवरून करावी? कोणते अॅप खरे ? कोणते खोटे ? याची माहिती नसते आणि त्यातून फसवणूक होण्याची शक्यता वाढते. अशी काही प्रकरणेही घडली आहेत. ऑफरला भुलून कोणत्याही लिंकवरून खरेदी केली तर फसवणूक होईल. त्यामुळे दिवाळीची ऑनलाइन खरेदी करीत असताना नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
ऑनलाईन खरेदी करताना हे ध्यानात ठेवा
- सुरक्षित वेबसाईट : आपण ज्या ऑनलाइन लिंकवरून खरेदी करीत आहोत, ती वेबसाईट सुरक्षित आहे का? याची तपासणी करून घ्यावी.
- अनोळखी लिंक टाळा: सोशल मीडियावर लिंक देऊन खरेदीची ऑफर दिली जाते, अशा अनोळखी लिंकवरून खरेदी करणे टाळावे.
- बँक खाते, कार्डचा तपशील सांभाळा कोणत्याही लिंकवर बँक खाते क्रमांक आणि कार्डचा तपशील विनाकारण देऊ नये.
- अनोळखी अॅप टाळा : अनोळखी अॅपवरून खरेदी करणे टाळावे. विश्वासार्हता लक्षात घ्या.
- ओटीपी शेअर नको : कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी शेअर करू नये.
कस्टमर केअर नंबर शोधताना काय काळजी घ्याल ?
खरेदी केल्यानंतर काही अडचणी निर्माण होतात. मग त्यानंतर कस्टमर केअर क्रमांक शोधला जातो. तो ऑनलाइन शोधू नये, अधिकृत अॅपवर कस्टमर केअर क्रमांक २ दिलेला असतो. त्यावरच संपर्क साधावा.
तर तीन तासांत करा सायबरकडे तक्रार
फसवणूक झाल्यास सायबरकडे तक्रार करणे अनिवार्य आहे. तीन तासांत तक्रार केली तर नुकसान टळू शकते.
सायबरच्या पोर्टलवरही करता येते तक्रार
cybercrime.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन रितसर तक्रार नोंदविता येते. या संकेतस्थळाला भेट दिली पाहिजे.
सुरक्षितता तपासा
"ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे. एचटीपीपीएस अशी सुरुवात असणाऱ्या वेबसाईटच वापरा. एस म्हणजे 'सेक्यूअर' खरेदी करतानाही 'कॅश ऑनडिलव्हरी' चांगला पर्याय आहे, तो वापरावा. अॅपची विश्वासार्हता तपासावी."
- किशोर पर्वते, पोलिस निरीक्षक, गोंदिया शहर