सावधान ! पोलीस पुन्हा उतरले मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:17 AM2021-02-22T04:17:43+5:302021-02-22T04:17:43+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याने पोलीस विभागाकडून मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध करण्यात येत असलेल्या दंडात्मक कारवाया बंद करण्यात आल्या ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याने पोलीस विभागाकडून मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध करण्यात येत असलेल्या दंडात्मक कारवाया बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा कोरोना डोके वर काढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यातच पोलीसही मैदानात उतरले असून, मास्क न लावणाऱ्यांंवर पुन्हा १०० रुपयांचा दंड ठोठावला जात आहे. यामुळे आता मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या नक्कीच कमी होणार यात शंका नाही.
दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली व त्यानंतर नववर्षही चांगलेच लाभले. राज्यातच कोरोना नियंत्रणात आला होता व जिल्ह्यात मोजकेच बाधित आढळत असल्याने सर्व काही सुरळीत झाले होते. यात जिल्हावासीयांना कोरोनाचा विसर पडला होता व कोरोनाविषयक उपाययोजनांनाही बगल दिली जात होती. मात्र आता मागील आठवड्यापासून राज्यात पुन्हा कोरोना पाय पसरू लागला असून विदर्भातील काही तालुके हिटलिस्टवर आहेत. याची दखल घेत राज्य शासनाने पुन्हा काही निर्बंध लागू केले आहेत. विशेष म्हणजे, नागपूरमध्येही कोरोनाचा उद्रेक झाला असून लगतच्या भंडारा जिल्ह्यातही कोरोना वाढत असल्याचे दिसत आहे. याकडे लक्ष देत जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी आदेश काढून पुन्हा काही निर्बंध लागू केले आहेत. यात त्यांनी मास्क लावण्याबाबतही सूचना दिल्या आहेत.
यासाठीच आता पोलीस कर्मचारी पुन्हा मैदानात उतरले असून मास्क न लावता फिरणाऱ्यांवर १०० रुपये दंडाची कारवाई सुरू केली आहे. मध्यंतरी पोलीस चौकाचौकांत उभे राहून मास्क न लावणाऱ्यांना पकडत असल्याने दंडाच्या भीतीने नागरिक मास्क लावत होते. मात्र आता पोलिसांनीही कारवाया बंद केल्याने सर्वांनाच रान मोकळे झाले होते. विशेष म्हणजे, मास्क हेच कोरोना पसरू न देण्याचे प्रभावी शस्त्र आहे. मात्र त्यानंतरही नागरिक मास्क न लावता बिनधास्तपणे फिरू लागले होते. अशात नियंत्रणात असलेल्या आपल्या जिल्ह्यात अनिष्ट घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. करिता आता पोलिसांनी पुन्हा दंडात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. यामुळे आता मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली असून, काही दिवसांत पुन्हा सर्वांच्या तोंडावर मास्क दिसणार, यात शंका नाही.
----------------------
आता ५०० रुपये दंड ठोठावण्याची गरज
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाही नागरिक बेजबाबदारपणे मास्क न लावता फिरत असल्याचे पाहून पालकमंत्र्यांनी अशांना थेट ५०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तब्बल ५०० रुपये खिशातून जाणार, या भीतीनेच सर्वांच्या तोंडावर तेव्हा मास्क चढले होते. मात्र सध्या कोरोना नियंत्रणात असल्याने पालकमंत्र्यांनी दंडाची रक्कम घटवून १०० रुपये करण्यास मंजुरी दिली होती. विशेष म्हणजे, सध्या सर्वांनीच आता खबरदारी घेण्याची गरज असून तसा इशाराही केंद्रीय समितीने दिला होता व त्याचे संकेत मिळू लागले आहेत. अशात आता मास्क न लावणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी ५०० रुपये दंड ठोठावण्यात यावा, असे काही सुज्ञ नागरिक बोलत आहेत.
------------------------------