वेळीच व्हा सावध, कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:25 AM2021-04-03T04:25:27+5:302021-04-03T04:25:27+5:30
गोंदिया : लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आता जिल्ह्यातसुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील आठवडाभरापासून बाधितांचा आलेख ...
गोंदिया : लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आता जिल्ह्यातसुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील आठवडाभरापासून बाधितांचा आलेख सातत्याने उंचावत असल्याने कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेटसुध्दा वाढला असून, तो ८.५५ टक्क्यांवर पाेहोचला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी वेळीच सावध होत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी (दि. २) जिल्ह्यात २०९ कोरोना बाधितांची नोंद झाली. मागील चार महिन्यातील हा सर्वाधिक आकडा होय. कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे याला वेळीच पायबंद लावण्यासाठी नागरिकांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे. शुक्रवारी २०९ कोरोना बाधितांची नोंद झाली, तर ४८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यात सर्वाधिक १०६ रुग्ण गोंदिया तालुक्यातील असून, त्यापाठोपाठ ४५ रुग्ण आमगाव तालुक्यातील आहेत. गोरेगाव २, अर्जुनी मोरगाव ५, सडक अर्जुनी ११, देवरी ७, तिरोडा २६, बालाघाट १, भंडारा जिल्ह्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १०४९५३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले असून, त्यापैकी ९१३०३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी अँटिजेन तपासणी केली जात आहे. यांतर्गत ९०३१५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८३३४० नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १६४३६ कोरोना बाधित आढळले असून, यापैकी १५१९१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १०५४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ७४७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..........
दररोज १८२२ चाचण्या
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात दररोज १०३४ आरटीपीसीआर आणि ७७८ रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या जात आहेत. यात आरटीपीसीआर चाचण्यांचा पाॅझिटिव्हिटी रेट ८.५५ टक्के, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट ७.७२ टक्के आहे. कोरोना बाधितांचा ग्राफ वाढत असला तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने ही थोडी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर १.२० टक्के आहे.
.......
मास्क, सॅनिटायझरचा करा नियमित वापर
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्क, सॅनिटायझर याचा नियमित वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी.
..............