वेळीच व्हा सावध ! रुग्णवाढीचा दर वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 05:00 AM2022-01-03T05:00:00+5:302022-01-03T05:00:06+5:30
जिल्ह्यात मागील वर्षी जून महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला होता. तर जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होती. मात्र मागील पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर रविवारी नऊ कोरोना बाधितांची नोंद झाली. हा गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत मोठा आकडा होय. तर गोंदिया तालुक्यातील अदासी येथील एका ५५ वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात कोरोना पुन्हा हळूहळू पाय पसरू लागल्याचे चित्र आहे. रविवारी (दि.२) जिल्ह्यात नऊ कोरोना रुग्णांची नोंद झाली तर एका बाधिताचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांनी वेळीच सावध होत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा संसर्गाचा वेग पुन्हा वाढून आपणच अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात मागील वर्षी जून महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला होता. तर जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होती. मात्र मागील पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर रविवारी नऊ कोरोना बाधितांची नोंद झाली. हा गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत मोठा आकडा होय. तर गोंदिया तालुक्यातील अदासी येथील एका ५५ वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी एकूण १२३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात १०७ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर १६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ९ नमुने कोरोना बाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.३ टक्के आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४७१९४१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २४७५६१ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २२४५०३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१७६६४ कोरोनाबाधित आढळले. यापैकी ४०५३० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
आपली सुरक्षा आपल्याच हाती
- कोरोना, ओमायक्रॉन पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत वाढ होण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरज आहे. आपली आपल्या कुटुंबाची सुरक्षा आपल्याच हाती असून, नियमित मास्कचा वापर, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आदी गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.
निर्बंधानंतरही नियमांची ऐसी-तैसी
- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केले आहे. मात्र या निर्बंधाची सरार्सपणे ऐसी-तैसी केली जात आहे. पर्यटनस्थळे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.