नगराध्यक्षांच्या दालनाचे सौंदर्यीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2017 12:43 AM2017-02-06T00:43:02+5:302017-02-06T00:43:02+5:30
नगर परिषदेतील नवनिर्वाचित प्रतिनिधींचा कार्यकाळ येत्या ७ तारखेपासून सुरू आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या स्वागतासाठी
फर्निचरचे काम सुरू : पालिकेच्या तिजोरीवर बसणार भुर्दंड
गोंदिया : नगर परिषदेतील नवनिर्वाचित प्रतिनिधींचा कार्यकाळ येत्या ७ तारखेपासून सुरू आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या स्वागतासाठी त्यांच्या दालनातील फर्नीचरचे काम सुरू झाले आहे. यासाठी सध्याचे फर्नीचर बाहेर वऱ्हांड्यात ठेवण्यात आले असून नव्या फर्नीचरचे काम सुरू असल्याचे दिसते. सोबतच रंगरोगण सुद्धा होत आहे. नव्या कार्यकाळाची ही सुरूवात असली तरी याचा भुर्दंड मात्र पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे.
नगर परिषदेच्या निवडणुका आटोपून आता नवनिवार्चितांचा कार्यकाळ ७ तारखेपासून सुरू होत आहे. त्यातही यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आल्याने नगर परिषदेत सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. सर्वाधीक सदस्य व नगराध्यक्ष घेऊन नगर परिषदेत या सर्वांचे आगमन होणार आहे. त्यामुळे नवनिर्वाचितांच्या स्वागतासाठी नगर परिषदेत जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीत प्रामुख्याने नगराध्यक्षांच्या दालनातील फर्नीचरचे काम सुरू आहे. तसेच इमारतीचे रंगरोगन केले जात आहे.
फर्नीचरच्या या कामासाठी दालनातील सध्याचे फर्नीचर बाहेर वऱ्हांड्यात काढून ठेवण्यात आले आहे. तर त्यांची मजा कार्यालयातील चपरासी व कामानिमित्त येणारे घेत आहेत. तसेच नवीन फर्नीचरचे काम तेथेच सुरू आहे. नवे नगराध्यक्ष आता दालनात बसणार असल्याने त्यांच्या मर्जीप्रमाणे हे काम सुरू असल्याचे कळते. तसेही जे-जे नगराध्यक्ष निवडून आले त्यांनी नेहमीच दालनात आपल्या मर्जीने काम करवून घेतल्याची परंपराच आहे.
ते काही असो, मात्र गोंदिया नगर परिषदेची आर्थिक स्थिती तशीही बरी नाही. आमदनी अठन्नी व खर्चा रूपय्या अशा स्थितीतून नगर परिषद वावरत आहे.
जनरल फंड मध्ये पैसे नसल्याने परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार होत नाही. तर आताही रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार अडून असल्याचे ऐकीवात आहे. अशात मात्र नगर परिषदेत सुरू असलेले हे काम म्हणजे पालिकेच्या तिजोरीवर भुर्दंडच दिसून येत आहे. मात्र यात पालिकेच्या तिजोरीतील जनतेच्या पैशांची उधळण होते असेही आता सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे. (शहर प्रतिनिधी)