पुरातन तलावांचे सौंदर्यीकरण करणार
By admin | Published: October 7, 2016 02:01 AM2016-10-07T02:01:36+5:302016-10-07T02:01:36+5:30
ऐतिहासिक पुरातन काळातील प्रतापगड पहाडीवरील तलावाचे सौंदर्यीकरण केले जाईल. त्याचप्रमाणे गणी अहमद ख्वाजा दर्ग्यावरील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यात येईल
पालकमंत्री : भूमिपूजन समारंभ
गोठणगाव : ऐतिहासिक पुरातन काळातील प्रतापगड पहाडीवरील तलावाचे सौंदर्यीकरण केले जाईल. त्याचप्रमाणे गणी अहमद ख्वाजा दर्ग्यावरील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यात येईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष अर्थ सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी प्रतापगड येथे विविध भूमिपूजन समारंभात केले.
अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. भूमिपूजक व उद्घाटक सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, माजी आ. दयाराम कापगते, सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, कृउबास सभापती काशीफ जमा कुरेशी, माजी सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, पं.स. सदस्य सुशिला हलमारे, जहीर पटेल कुरेशी, सरपंच अहिल्या वालदे, उपसरपंच तेजराम राऊत, तालुका भाजपा महामंत्री भोजराज लोगडे, यशवंत गणवीर, काशिनाथ ठाकरे, पोलीस पाटील योगेश जनबंधू, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवी गणवीर, केवळराम पुस्तोडे, डॉ. कुंभरे, मजीप्रचे कार्यकारी अभियंता शर्मा आदी मंचावर उपस्थित होते.
ना. बडोले पुढे म्हणाले, प्रतापगड येथील महाशिवरात्रीला भरणारी यात्रा ‘क’ श्रेणीची आहे. ते आपण ‘ब’ श्रेणीमध्ये आणण्याचे काटेकोर प्रयत्न करणार. भक्त निवासापासून तिबेट कॅम्पकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण केले जाईल. ऐवढेच नाही तर प्रतापगडला जोडणाऱ्या चार बाजूच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येईल, असे ते म्हणाले. या वेळी अधिकारी, पदाधिकारी व गावकरी यांनी मिळून संयुक्तरित्या एकत्रित घेवून विकास कामात सहकार्य करण्याचे आवाहन जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी केले. तर माजी आ. दयाराम कापगते यांनी प्रतापगड हे गाव एकेकाळी बेट असल्यासारखे होते, परंतु आता शासनाच्या विविध योजनेतून रस्ते, पायऱ्यांचे काम करण्यात आले. त्यामुळे पर्यटनाचे महत्व वाढल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने झाली. भूमिपूजन समारंभ प्रतापगड ग्रामपंचायतने केले. प्रास्ताविक खंड विकास अधिकारी नारायणव जमईवार यांनी मांडले. संचालन विस्तार अधिकारी भावे यांनी केले. यावेळी आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. (वार्ताहर)