एका हॉलमध्ये बेड लावले म्हणजे झाले काेविड केअर सेंटर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:12 AM2021-05-04T04:12:54+5:302021-05-04T04:12:54+5:30
गोंदिया : गोरेगाव तालुक्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी १० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे ...
गोंदिया : गोरेगाव तालुक्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी १० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले होते. मात्र आरोग्य विभागाने केवळ एका हॉलमध्ये १० बेडची व्यवस्था करून मोकळे होण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे एका हॉलमध्ये बेड लावले म्हणजे ते कोविड केअर सेंटर झाले का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गोंदिया, गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यात सातत्याने कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र त्या तुलनेत गोरेगाव आणि तिरोडा येथे आरोग्यविषयक सुविधा नसल्याने रुग्णांना गोंदिया येथे रेफर केले जात आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना १० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र तालुका आरोग्य विभागाने केवळ एक हॉल भाड्याने घेऊन तिथे बेड लावले असून तीन ऑक्सिजन सिलिंडर लावून ठेवले आहेत. तसेच दोन डॉक्टरांचीसुध्दा यासाठी नियुक्ती करण्यात आली. मात्र इतर सोयीसुविधांचा पूर्णपणे अभाव आहे. या ठिकाणी अद्यापही एका रुग्णाला दाखल केले जात नसून रेफर टू गोंदिया केले जात आहे. त्यामुळे हे कोविड केअर सेंटर केवळ नावापुरतेच ठरत आहे. रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री नवाब मलिक यांनी रुग्णालयांना भेट देऊन रुग्णांची गैरसोय होणार याची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतर कोविड केअर सेंटरचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.
......
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा फोन स्विच ऑफ
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला २४ तास अलर्ट राहण्याच्या सूृचना करण्यात आल्या आहेत. अशात गंभीर रुग्णांना दाखल करताना मोठी समस्या निर्माण होत आहे. तर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा मोबाईल स्विच ऑफ राहत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
.....
कोट
गोरेगाव तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे आरोग्यविषयक सोयीसुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. एका हॉलमध्ये बेड लावून ठेवण्यात आले असून इतर सोयीसुविधांचा पूर्णपणे अभाव आहे. तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चिंधालोरे यांचा मोबाईल स्विच ऑफ राहत असल्याने समस्येत वाढ झाली आहे.
- दिलीप बन्सोड, माजी आमदार