धक्कादायक! शेतकऱ्यांवर मधमाशांचा हल्ला, दोघांचा मृत्यू, ५ जखमी; गोरेगाव तालुक्यातील घटना

By अंकुश गुंडावार | Published: August 4, 2023 12:43 PM2023-08-04T12:43:05+5:302023-08-04T12:43:26+5:30

रोवणीचे काम करताना केला हल्ला

Bees attack farmers; 2 killed, 5 injured | धक्कादायक! शेतकऱ्यांवर मधमाशांचा हल्ला, दोघांचा मृत्यू, ५ जखमी; गोरेगाव तालुक्यातील घटना

धक्कादायक! शेतकऱ्यांवर मधमाशांचा हल्ला, दोघांचा मृत्यू, ५ जखमी; गोरेगाव तालुक्यातील घटना

googlenewsNext

गोंदिया : शेतात रोवणीचे काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. तर एका शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असून ५ शेतमजूर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथे घडली.

सुमन आनंदराव आमडे असे मृत महिलेचे व लक्ष्मीचंद पुरनलाल पटले (६५) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहेत. तर अंकित लक्ष्मीचंद पटले (२७), ग्यानीराम उईके (५७), माया आमडे (४२), अशी प्रकृती चिंताजनक असलेल्या शेतकऱ्यांची नाव आहेत. जखमींमध्ये मंदा आमडे (४२), प्रमिला चौधरी (३०) यांचा समावेश आहे. सर्व कुऱ्हाडी येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे परिसरात मधमाशांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात सद्या सर्वत्र रोवणीचे काम सुरू आहे.

शेतकरी व शेतमजूर सकाळपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेतात काम करत आहेत. कुऱ्हाडी येथील रहिवासी शेतकरी लक्ष्मीचंद पटले यांच्या शेतात भात लावणीचे काम करुन सायंकाळी एकत्र होऊन परतत असताना अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. या घटनेत लक्ष्मीचंद पटले, त्यांचा मुलगा अंकित पटले व माया आमडे, मंदा आमडे, प्रमिला चौधरी, ज्ञानीराम उईके हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मात्र उपचारादरम्यान सुमन आमडे यांचा गुरुवारी रात्री उशिरा, तर लक्ष्मीचंद पटले यांचा शुक्रवारी (दि.४) पहाटे ४ च्या सुमारास मृत्यू झाला. तर लक्ष्मीचंद पटले यांचा मुलगा अंकित पटले हा पण गंभीर जखमी असून त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर गोंदियातच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जि.प. सदस्य शैलेश नंदेश्वर व इतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली.

आर्थिक मदतीची तरतूद पाहणार

मधमाशांचा हल्ला हा गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत बसत नाही पण आणखी कोणत्या शासकीय योजनेत हे बसवून मृतांच्या नातेवाईकांना मदद मिळावी असे प्रयत्न आमचे राहणार असल्याचे गोरेगावचे तहसीलदार नागपुरे यांनी सांगितले.

Web Title: Bees attack farmers; 2 killed, 5 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.