अतिक्रमण हटाव मोहीम कारवाईला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:02 PM2017-11-18T22:02:32+5:302017-11-18T22:03:58+5:30
शहरातील मुख्य मार्गाच्या दुतर्फा काही व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : शहरातील मुख्य मार्गाच्या दुतर्फा काही व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नगर परिषदेतर्फे शहरात पाच सहा दिवसांत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अतिक्रमणीत ठिकाणे मार्किंग करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
शहरातील वाढते अतिक्रमण आता शहरवासीय आणि प्रशासन या दोघांसाठीही डोकेदुखीचे ठरत आहे. वाढत्या अतिक्रमणाच्या या समस्येवर आळा घालण्यासाठी नगर परिषदेने मध्यंतरी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मात्र या मोहिमेत मारहाण करण्यापर्यंत प्रकरण गेले होते. त्यामुळे ही मोहीम थांबविण्याची वेळ नगर परिषदेवर आली. एकंदरीत नगर परिषद प्रशासनाला अतिक्रमणकर्त्यापुढे नमावे लागले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अतिक्रमणाचा हा विषय मागील कित्येक वर्षांपासून सुरू असून अद्याप कुठलाच तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर नगर परिषदेत भाजपाची सत्ता आल्यानंतर त्यांनी अतिक्रमणाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हालचाल करण्यास सुरूवात केली. शहरातील अतिक्रमणाच्या प्रश्नावर आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. त्यात नगर परिषद, जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि नगररचना विभाग यांच्या संयुक्तपणे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानंतर आता सर्वप्रथम अतिक्रमण स्थळांना मार्कींग करण्याचे करण्याचे काम नगर परिषदेने सुरू केले आहे. मार्कींगचे काम पूर्ण झाल्यावरच नगर परिषद पाच ते सहा दिवसांनी अतिक्रमण हटविण्यास सुरूवात करणार आहे.