पाण्यासाठी बेलाटीवासीयांचा पंचायत समितीवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:25 AM2021-04-05T04:25:35+5:302021-04-05T04:25:35+5:30
तिराेडा : तालुक्यातील ग्राम बेलाटी येथील विठ्ठलरुखमाई पाणीपुरवठा योजनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ...
तिराेडा : तालुक्यातील ग्राम बेलाटी येथील विठ्ठलरुखमाई पाणीपुरवठा योजनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून येथील पाणीपुरवठा योजना बंद आहे. परिणामी, बेलाटीवासीयांची पाण्यासाठी भटकंती होत असून यातूनच नागरिकांनी शुक्रवारी पंचायत समितीसमोर हल्लाबोल आंदोलन केले.
बेलाटी बु. व मुंडीपार मिळून विठ्ठलरुखमाई पाणीपुरवठा योजना समिती तयार करण्यात आली आहे. या समितीने सन २०१२ पासून २०१७ पर्यंत हिशेब व कागदपत्रे सोपविली नाही. तत्कालीन समितीने नळकनेक्शन घेण्याकरिता प्रतिकनेक्शन ६०० रुपये अनामत रक्कम तसेच प्रत्येक जलधारकाकडून दरमहा १२० रुपये जमा केले. तसेच योजना चालविण्यासाठी जमा केले व त्याचासुद्धा हिशेब दिला नाही. वीजबिल न भरल्यामुळे वीजवितरण कंपनीने विजेचे कनेक्शन कापले व त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून येथील गावकऱ्यांना चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. येथील नागरिकांनी पंचायत समितीला अनेकदा तक्रार देऊन संबंधित समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी व पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू करावी, असे निवेदन दिले. मात्र, यातून काही मार्ग न निघाल्याने शुक्रवारी खा. सुनील मेंढे यांची पंचायत समिती येथे आढावा बैठक असल्याने दोन्ही गावांतील महिला, पुरुषांनी पंचायत समितीवर हल्लाबोल केला. दरम्यान, पोलिसांना सूचना देण्यात आल्यावरून तिरोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी आपल्या ताफ्यासह हजर झाले. काही महिलांनी पंचायत समितीसमोर ठिय्या मांडल्यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आ. विजय रहांगडाले यांनी त्यांना समजावून येत्या सात दिवसांत काहीतरी मार्ग काढून ही नळयोजना सुरू करण्याचे आश्वासन दिले. आश्वासनानंतर नागरिक शांत झाले. मात्र, नळयोजना सुरू न झाल्यास आणखी आक्रमक पवित्रा घेऊ, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.