तिसऱ्या लाटेची घंटा वाजली; गोंदिया जिल्ह्यात तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:29+5:302021-07-19T04:19:29+5:30
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असताना तिसऱ्या लाटेची घंटा वाजली आहे. तिसऱ्या लाटेत सर्वाधिक ...
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असताना तिसऱ्या लाटेची घंटा वाजली आहे. तिसऱ्या लाटेत सर्वाधिक बालके बाधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेत बालरोगतज्ज्ञांची मोठी गरज भासणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात किती बालरोगतज्ज्ञ आहेत, याचा आढावा घेतला आहे. बालरोगतज्ज्ञांची मोजकीच पदे आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील आरोग्याची धुरा ही प्राथमिक आरोग्य केंद्रांवर असते. मात्र, जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांत एकही बालरोगतज्ज्ञ नाही. देवरी व अर्जुनी-मोरगाव या दोन ग्रामीण रुग्णालयांत आणि तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी एक बालरोगतज्ज्ञ कार्यरत आहे; तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आठ आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयात तीन बालरोगतज्ज्ञ कार्यरत आहेत. मात्र, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता कार्यरत बालरोगतज्ज्ञांची पदे मोजकीच आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञांची पदे भरण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयाचा दौरा करून आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.
.....................
दोन ठिकाणी ऑक्सिजन प्लांट
- येथील वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी हा प्लांट उभारण्यात आला आहे.
- तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात येत आहे. हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. गोंदियातील प्लांट सुरू झाले असून तिरोडा येथील प्लांट सुरू होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती अधीक्षक डॉ. हिम्मत मेश्राम यांनी दिली.
- येथील वैद्यकीय महाविद्यालयात असलेले ऑक्सिजन प्लांट १ मिनिटाला १ हजार लिटर, तर तिराेडाचे ऑक्सिजन प्लांट १ मिनिटाला २०० लिटर ऑक्सिजन पुरविणार आहे.
..................................
पहिली लाट
एकूण रुग्ण- २८३५४
बरे झालेले रुग्ण- २८५३२
मृत्यू- १७८
...........
दुसरी लाट-
एकूण रुग्ण- १२८१८
बरे झालेले रुग्ण-१२४२१
मृत्यू- ३९७
...............................
१८ वर्षे वयोगटातील एकूण लोकसंख्या- ६२५०००
एकूण लसीकरण- ५३२३८३
पहिला डोस- ४०३५६८
दोन्ही डोस- १०६९२०
......................
बालकांसाठी १०० खाटांचे कक्ष
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच अनुषंगाने आरोग्य विभागाने तयारी केली आहे. केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात ६० खाटा व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात ४० खाटा असे एकूण १०० खाटांचे विशेष कक्ष बालकांसाठी तयार करण्यात आले आहेत. यासाठी बालरोगतज्ज्ञांचा विशेष टास्क फोर्स तयार करण्यात आला. यासाठी शहरातील २० बालरोगतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.
......................
लहान मुलांसाठी केअर सेंटर
बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात लहान मुलांसाठी केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. शिवाय येथील खासगी बालरोगतज्ज्ञांची सेवादेखील तिसऱ्या लाटेत घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी दिली आहे.
....................
कोराेनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने नियोजन सुरू केले आहे. १०० खाटांचे विशेष कक्ष आणि टास्क फोर्सही स्थापन करण्यात आला आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम आहे.
- नयना गुंडे
जिल्हाधिकारी, गोंदिया