ब्लॉकचा लाभ रेल्वे कर्मचाऱ्यांच्या खिशात
By admin | Published: May 12, 2017 01:12 AM2017-05-12T01:12:26+5:302017-05-12T01:12:26+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य मार्गावर रेल्वे प्रशासनाने १५ मे पर्यंत मेगा ब्लॉक घोषित केला आहे.
ट्रेन हाऊसफुल्ल : पॅसेंजर गाड्यांचे प्रवासी एक्स्प्रेसच्या आरक्षित बोगीत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य मार्गावर रेल्वे प्रशासनाने १५ मे पर्यंत मेगा ब्लॉक घोषित केला आहे. त्यात अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या गंतव्य स्थानकावर पोहोचत नसून त्यापूर्वी परतत आहेत. अशात प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली असून अनेक प्रवाशी मिळेल त्या गाड्यांमध्ये चढून आपला प्रवास पूर्ण करीत आहेत. यात मात्र तिकीट तपासणी करणारे रेल्वे कर्मचारी विनापावतीचा दंड प्रवाशांकडून वसूल करीत असल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले आहे.
सध्या लग्नसराईची धूम सुरू आहे. त्यातच पॅसेंजर गाडी रद्द असल्याने अनेक प्रवाशांनी सामान्य तिकीट घेवून एक्स्प्रेस गाडीने प्रवास करणे पसंद केले. मात्र सामान्य (जनरल) बोगीमध्ये पाय ठेवायलासुद्धा जागा नसल्याने अनेक प्रवासी सामान्य तिकीट घेवून आरक्षित बोगींमध्ये चढून प्रवास करताना आढळले. यात गाडीतील रेल्वे तिकीट निरीक्षकांनी सामान्य तिकिटांद्वारे प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना गाडी थांबेल त्या स्थानकावर उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र सामान्य बोगीमध्ये जागा नसल्याने प्रवाशी उतरण्यास नकार देत होते. अशात रेल्वे कर्मचाऱ्यांनी आरक्षित बोगीत असलेल्या सामान्य तिकीट धारक प्रवाशांना विनापावतीचा दंड आकारला. यावरून वसूल केलेला तो पैसा रेल्वे कर्मचाऱ्यांच्या खिशात गेला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
गुरूवारी (दि.११) इतवारी-गोंदिया (५८२०६) ही पॅसेंजर गाडी रद्द असल्यामुळे या मार्गावरील प्रवासी मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस (१२१०५) या सुपरफास्ट गाडीत बसले होते. सामान्य बोगीत तर पाय ठेवायलासुद्धा जागा नसल्याने ते एस-९ व एस-१० या आरक्षित बोगीत चढले होते. यावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्या प्रवाशांना भंडारा, तुमसर व तिरोडा या रेल्वे स्थानकांत उतरण्यास सांगितले होते. मात्र सामान्य बोगी हाऊसफुल्ल असल्याने प्रवाशांनीच उतरण्यास नकार दिला.
यावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून पैसे घेवून पावती न देताच प्रवास करण्याची मूभा दिली. काही प्रवाशांनी पैसे देण्यास नकार देवून रेल्वे कर्मचाऱ्यांशीच हुज्जत घातल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अशावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारीसुद्धा कुठे बेपत्ता झाले होते, हे सांगायला पर्याय नाही.
कर्मचारी पोहोचले १२ वाजता कार्यालयात
एकीकडे ब्लॉक असल्याने काही रेल्वेगाड्या रद्द आहेत, तर दुसरीकडे रद्द नसलेल्या गाड्या विलंबाने धावत आहेत. या प्रकारामुळे अप-डाऊन करणारे कर्मचारी विदर्भ एक्सप्रेसने गोंदियाला पोहोचले. मात्र गुरूवारी विदर्भ एक्सप्रेस पाऊन तास विलंबाने धावत असल्याने ती जवळपास ११.५० वाजता गोंदिया स्थानकावर पोहोचली. त्यामुळे विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी दुपारी १२ ते १२.३० वाजतापर्यंत आपल्या कार्यालयात पोहोचले.
प्लॅटफॉर्मवरही एकच गर्दी
इतवारी-गोंदिया पॅसेंजर गाडी रद्द असल्याने विदर्भ एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची एकच गर्दी उसळली होती. ही गाडी गोंदियाच्या प्लॅटफॉर्म-५ वर थांबताच फलाटावर कधी नव्हे एवढी गर्दी पहायला मिळाली. पादचारी पुलावर चढण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. पादचारी पूलही हाऊसफुल्ल झाल्याने अत्यंत संथगतीने प्रवाशांची पाऊले पुढे वाढत होती. तर काही प्रवाशांनी पादचारी पुलावर न चढता सरळसरळ रेल्वे टॅ्रक ओलांडून प्लॅटफॉर्म-४ वर चढून रेल्वे नियमांचा भंग केला. सुरक्षा व प्रतिबंध करण्यासाठी तेथेसुद्धा कोणीही रेल्वे पोलीस नव्हता.