१२ गावांतील आदिवासींच्या शेतीला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2017 01:27 AM2017-05-19T01:27:34+5:302017-05-19T01:27:34+5:30
झासीनगर उपसा सिंचन योजना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी (दरे) गावाजवळ इटियाडोह प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातून
झासीनगर उपसा सिंचन योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : झासीनगर उपसा सिंचन योजना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी (दरे) गावाजवळ इटियाडोह प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातून प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या योजनेमुळे अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १२ गावांच्या आदिवासी लोकांच्या शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे.
या योजनेचे एकूण लाभक्षेत्र २ हजार ५०० हेक्टर असून सिंचन क्षमता ४ हजार २२५ हेक्टर आहे. तसेच मुख्य कालव्याच्या सा.क्र. २९८० मीटर वरून निर्गमित होणाऱ्या पुरक कालव्याद्वारे नवेगावबांध जलाशयाच्या लाभक्षेत्रातील १५०० हेक्टर, जब्बारखेडा लघु कालवा मुख्य कालव्याच्या सा.क्र. १५०० मीटर वरून निर्गमित होत असून त्यावर ३४९.४५ हेक्टर क्षेत्र, सा.क्र. १६० मीटर सरळ विमोचकावर येरंडी गावाचे ४० हेक्टर क्षेत्र, पवनी क्र.१, पवनी क्र.२, जांभळी लघु कालवा, रामपुरी लघु कालवा, तिडका लघु कालवा व झासीनगर लघु कालवा हे बंद पाईप नलिकेद्वारे प्रस्तावित असून याद्वारे २ हजार १२० हेक्टर क्षेत्र सिंचन करावयाचे आहे.
झासीनगर उपसा सिंचन योजनेस मूळ प्रशासकीय मान्यता आॅक्टोबर १९९६ मध्ये मिळाली. सन १९९६ ते २००२ या कालावधीत प्रकल्पावर अल्प तरतूद असल्याने प्रत्यक्ष कामांना मार्च २००२ मध्ये सुरूवात झाली. सन २००२ ते २००८ या कालावधीत वनजमीन मान्यता व प्रत्यक्ष हस्तांतरण न झाल्यामुळे प्रकल्प रेंगाळला. सन २००८ ते २०१० या कालावधीत कालव्यासाठी लागणाऱ्या खासगी जमिनीच्या भू संपादनाअभावी कालव्याची कामे रेंगाळली. या कालावधीत प्रकल्पाची किंमत वाढून प्रकल्पास प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मार्च २००८ मध्ये मिळाली. सन २००८ पासून प्रत्यक्ष कामांना सुरूवात झाली.
सदर सर्व कारणांमुळे प्रकल्प रेंगाळला होता. परंतु हे राज्य सरकार आल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पास १२७.२१ कोटींची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता आॅक्टोबर २०१६ मध्ये प्राप्त झाली. त्यामुळे सदर प्रकल्पास गती मिळाली असून पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध असल्यामुळे उर्वरित सर्व कामे मे-जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग, गोंदिया यांनी सांगितले.
मुख्य कालवा पूर्णत्वाच्या मार्गावर
सदर योजनेत प्रत्येकी ५०० अश्वशक्तीच्या दोन व्हर्टीकल पंपांद्वारे १.३६२ घमी/सेकंद या विसर्गाने पाणी ३४.६४ मीटर उंचीवर उपसा करून सिंचनासाठी वापरण्याचे प्रस्तावित आहे. सदर उर्ध्वनलिकेची ९०० मी.मी. व्यासाची, १९५० मीटर लांबीची एक रांग पूर्ण करण्यात आली असून वितरण हौदाद्वारे मुख्य कालव्यात पाणी देण्यात येणार आहे. मुख्य कालव्याची लांबी १३.५९ किमी आहे. मुख्य कालव्याच्या सा.क्र.२९८० मीटर वरून निर्गमित होणाऱ्या पुरक कालव्याद्वारे नवेगाव तलावात मे २०१८ मध्ये पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बंदिस्त पाईप लाईनमुळे लाभ
सा.बां. विभागाकडील दोन रस्ते ओलांडणीचे कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच ७ ते १० किमी मधील वनक्षेत्रातील कामे मर्यादित रूंदीत करावयाची असल्याने सदर कामे बंद पाईपलाईनद्वारे करणे प्रस्तावित आहे. सदर कामांचे अंदाजपत्रके तयार करण्यात आले असून सदर कामे मंजुरीच्या स्तरावर आहेत. पावसाळ्यानंतर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुढील काही वर्षे लघु कालव्यांपैकी जब्बारखेडा लघु कालवा पारंपरिक पद्धतीने करावयाचा असून सदर लघू कालव्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच उर्वरित लघु कालवा पवनी १, पवनी २, जांभळी, रामपुरी, तिडका व झाशीनगर लघु कालवे वनक्षेत्रातून जात असल्याने सदर लघु कालवे, बंदिस्त पाईप लाईन प्रणालीने जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. सदर बंदिस्त पाईप लाईन प्रणालीमुळे, खासगी जमीन लागणार नसून वनक्षेत्रास अतिरिक्त मंजुरी, लागणारा वेळ व वनक्षेत्र यात बचत होणार आहे.
सिंचनाखाली येणारी गावे
पवनी १ लघु कालव्याद्वारे ३२.८८ हेक्टर क्षेत्र, पवनी-२ लघु कालव्याद्वारे ३८.४३ हेक्टर क्षेत्र, जांभळी लघु कालव्याद्वारे १०८.२६ हेक्टर क्षेत्र, रामपुरी लघु कालव्याद्वारे ३९६.६५ हेक्टर क्षेत्र, तिडका लघु कालव्याद्वारे ५६४.१९ हेक्टर क्षेत्र, झाशीनगर लघु कालव्याद्वारे ७८३.४० हेक्टर क्षेत्र, जब्बारखेडा लघु कालव्याद्वारे ३४९.४५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याद्वारे जब्बारखेडा, येरंडी, पवनी, कोहलगाव, धाबेटेकडी, जांभळी, चुटिया, कान्होरी, तिडका, येलोडी, रामपुरी या गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
जून २०१८ पर्यंत उर्वरित कामे होणार पूर्ण
सदर प्रकल्पावर आजपर्यंत ७४.११ कोटी रूपये खर्च झालेले आहेत. चालू वर्षात १६ कोटींचा निधी प्रकल्पावर उपलब्ध आहे. उर्वरित निधी पुढील वर्षे नियत, व्यय (रेग्युलर बजेट) व आदिवासी विभागामार्फत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रामपुरी लघु कालवा, तिडका लघु कालवा, झाशीनगर लघु कालवा, जब्बारखेडा लघु कालवा या कालव्यांची कामे जून २०१८ पर्यंत पूर्ण होण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. प्रकल्पाचे लाभ दोन टप्प्यात द्यावयाचे असल्याने पहिल्या टप्प्यांतर्गत पंपाची चाचणी करून येत्या पावसाळ्यानंतर नवेगावबांध जलाशयात पाणी भरून जून २०१८ पर्यंत उर्वरित कामे पूर्ण करून प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.