एसटीच्या मालवाहतुकीला ‘बेस्ट रिस्पॉन्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:08+5:302021-06-05T04:22:08+5:30
कपिल केकत गोंदिया : कोरोनाच्या दहशतीने नागरिकांनी प्रवासाला बगल दिल्याने राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान ...
कपिल केकत
गोंदिया : कोरोनाच्या दहशतीने नागरिकांनी प्रवासाला बगल दिल्याने राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाने सुरू केलेल्या मालवाहतुकीला मात्र येथे चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आगाराने मे महिन्यात तब्बल ५३ बुकिंग घेतल्या असून त्यातून दोन लाख ५७ हजार ७५० रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. विशेष म्हणजे, एसटीचा प्रवास सुरक्षित राहत असल्याने आता लांब अंतरावरच्या मालाचे बुकिंग आगाराला मिळत आहेत.
प्रवासी सेवेसाठी अत्यंत सुरक्षित मानली जाणारी एसटीची सेवा वाखाणण्याजोगी आहे. मात्र परिस्थिती बदलल्यास त्यानुसार स्वत:ला बदलून घ्यावे लागते. या म्हणीनुसार महामंडळालाही कोरोनामुळे स्वत:ला बदलून घेण्याची पाळी आली आहे. त्याचे असे की, मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने महामंडळाला चांगलाच फटका बसला. हा फटका भरून काढण्यासाठी महामंडळाने मालवाहतुकीचा प्रयोग राज्यात राबविला. त्यानुसार, गोंदिया आगारानेही त्यात उडी घेतली व मालवाहतुकीसाठी प्रयत्न केले. सुरुवातीला त्याला चांगला प्रतिसाद मिळून आला नाही. मात्र आगारातील कर्मचाऱ्यांनी हार न मानता आपले प्रयत्न सुरूच ठेवले.
आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महामंडळाला पुन्हा नुकसानीत टाकले असून प्रवासी वाहतूक मागील महिनाभर बंदच होती. मात्र यंदा आगारातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे फलित मिळाल्याचे दिसले. कारण, आगारातील प्रवासी वाहतूक जरी बंद होती तरीही आगाराने मे महिन्यात मालवाहतुकीच्या तब्बल ५३ बुकिंग घेऊन त्यातून दोन लाख ५७ हजार ७५० रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत हाती आलेले हे उत्पन्न जरी कमी असले तरीही फुल नाही, पण फुलाची पाकळीच या दृष्टीने बघितल्यास आगारासाठी ही फायद्याचीच बाब ठरत आहे.
------------------------------------
३ दिवसांत १५ बुकिंग
मे महिन्यात केलेल्या उत्तम कामगिरीसह आता आगाराने जून महिन्यातील या ३ दिवसांत १५ बुकिंग करून त्यातून ७३ हजार ३३० रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. आता महिन्याची सुरुवात झाली असून आगाराकडे मालवाहतुकीसाठी आणखीही बुकिंग असल्याची माहिती आहे. म्हणजेच, महामंडळाचा मालवाहतुकीचा प्रयोग आता यशस्वी होताना दिसत आहे.
--------------------------------
मुंबई- कोल्हापूरपर्यंतचे बुकिंग
राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या एसटीसाठी अख्ख्या महाराष्ट्राची कवाडे खुली आहेत. यामुळे कुणालाही-कोठेही मालवाहतूक करावयाची असल्यास एसटीव्दारे काहीच अडचण येत नाही. यातूनच गोंदिया आगाराने अमरावती, नागपूर, अकोला व लगतच्या जिल्ह्यांसह थेट मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, जालना अन्य लांब अंतरावरील बुकिंगही केले आहेत. एसटीच्या प्रवासाप्रमाणेच मालवाहतूकही सुरक्षित असल्याने आता नागरिकांचा कल एसटीच्या मालवाहतुकीकडे दिसत असून यातूनच एसटीच्या मालवाहतुकीला ‘बेस्ट रेस्पॉन्स’ दिसून येत आहे.