४० लाखांत घेतली सुपारी, हाती आले पाच हजार! नागसेनच्या घरी राहून आठवडाभर केली रेकी  

By नरेश रहिले | Published: January 14, 2024 06:22 PM2024-01-14T18:22:45+5:302024-01-14T18:22:58+5:30

काम झाल्यावरच पैसे दिले जातील असे ठरल्याने आराेपींनी गोंदियात आठ दिवस मुक्काम केला होता.

Betel nut bought for 40 lakhs, received five thousand Stayed at Nagsen's house and did Reiki for a week | ४० लाखांत घेतली सुपारी, हाती आले पाच हजार! नागसेनच्या घरी राहून आठवडाभर केली रेकी  

४० लाखांत घेतली सुपारी, हाती आले पाच हजार! नागसेनच्या घरी राहून आठवडाभर केली रेकी  

गोंदिया: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव (४२, रा. बाराखोली, सिंधी कॉलनी, गोंदिया) यांच्यावर गुरुवारी (दि. ११) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गोळीबार करणाऱ्या आरोपींना ४० लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात आरोपींना फक्त पाच हजार रुपये देण्यात आले होते; परंतु आरोपींनी दिलेली ही माहिती सत्य की निव्वळ चर्चाच याचा उलगडा मुख्य आरोपीच्या अटकेनंतरच होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

आर्थिक व्यवहारातून माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींनी त्यांच्यावर कुणाचे लक्षही जाऊ नये यासाठी मोठ्या शिताफीने गुन्हेगारी जगतात नसलेल्या तरुणांची निवड केली. या प्रकरणात कल्लू यादव यांचा काटा काढण्यासाठी आरोपीने तब्बल ४० लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे; परंतु ठरलेल्या ४० लाखांपैकी फक्त पाच हजार रुपये आणि बंदूक आरोपींपर्यंत पोहोचवण्यात आली. काम झाल्यावरच पैसे दिले जातील असे ठरल्याने आराेपींनी गोंदियात आठ दिवस मुक्काम केला होता. या आठवडाभरात कल्लू यादव कुठे राहतात, कुठे जातात, कशाने जातात, त्यांच्या कोणत्या कामाची कोणती वेळ आहे, त्यांच्या सोबत कोणकोण असतात, एकापेक्षा जास्त लोक असले तर आपण कोणत्या पद्धतीने गोळीबार करायचा याचा इत्यंभूत आराखडा आरोपींनी तयार केला होता. या आठ दिवसांत त्यांच्या राहण्याची सोय नागसेन बोधी मंतो (४१, रा. गौतम बुद्ध वॉर्ड, श्रीनगर, गोंदिया) याच्या घरी करण्यात आली होती, तसेच गोंदियातील एका लॉजमध्येही ते थांबले होते. आठ दिवस गोंदियात राहून त्यांनी रेकी केली होती.
 
पुरावा नष्ट करण्याच्या तयारीतूनच रचला कट
कल्लू यादव प्रकरणात पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासात आरोपी प्रशांत मेश्राम हा मुख्य आरोपी असल्याचे पुढे आले आहे. त्याने आपण या प्रकरणात अडकू नये यासाठी बंदूक दुसऱ्याच्या हातात दिली. दुसऱ्याने तिसऱ्याच्या हातात, तिसऱ्याने चौथ्याच्या हातात अशी ती बंदूक आरोपीच्या हातात पोहोचली. या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा आरोपींचा मानस असल्याचे पोलिसांच्या लक्षात येत आहे.
 
दोघांना २२ पर्यंत पोलिस कोठडी
कल्लू यादव यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींना शहर पोलिसांनी शनिवारी (दि.१३) रात्री ९ वाजता अटक केली आहे. शुभम विजय हुमने (२७, रा. भीमनगर, गोंदिया) व सुमित ऊर्फ पंछी विकास डोंगरे (२३, रा. कुंभारेनगर, गोंदिया), अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांनाही २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात स्पष्ट झालेल्या आरोपींची संख्या आठ झाली असून, यातून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी फरार आहेत.

Web Title: Betel nut bought for 40 lakhs, received five thousand Stayed at Nagsen's house and did Reiki for a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.