‘ बेवारटोला’ घटनेचे नाव घेताच दाटते हृदय ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:47+5:302021-05-30T04:23:47+5:30

नरेश रहिले/ १६ वा शहीद स्मृती दिन गोंदिया : देशसेवेबरोबर समाजसेवेचे व्रत अंगी बाळगणाऱ्या पोलिसांना जीव मुठीत घेऊनच नोकरी ...

‘Bevartola’ heart throbs at the mention of the incident () | ‘ बेवारटोला’ घटनेचे नाव घेताच दाटते हृदय ()

‘ बेवारटोला’ घटनेचे नाव घेताच दाटते हृदय ()

Next

नरेश रहिले/ १६ वा शहीद स्मृती दिन

गोंदिया : देशसेवेबरोबर समाजसेवेचे व्रत अंगी बाळगणाऱ्या पोलिसांना जीव मुठीत घेऊनच नोकरी करावी लागते. २४ तास जनतेच्या संरक्षणासाठी राबणाऱ्या पोलिसांना नक्षलवाद्यांशी लढता-लढता आहुतीही द्यावी लागते. जिल्ह्यात १६ वर्षांपूर्वी घडलेल्या बेवारटोला येथील घटनेचे नाव घेताच अंगावर शहारे येतात. या घटनेचे साक्षीदार दोन पोलीस कर्मचारी आहेत. ही घटना स्वत: अनुभवणारा पोलीस शिपाई सचिन वसंतराव सोेनुले, तर दुसरा जयंत हुकरे हा आहे. मात्र, ११ जुलै २०१२ मध्ये त्याच्या वाहनासमोर रानडुक्कर आल्याने त्याला कायमचे अपंगत्व आले.

३० मे २००५ हा दिवस जिल्हा पोलिसांसाठी काळा दिवस ठरला. बेवारटोला धरणातील दगड फोडण्यासाठी पोलिसांच्या गाडीत स्फोटके भरून वाहून नेत होते. पोलीस येणार या माहितीने नक्षलवाद्यांनी पूर्वीच रस्त्यावर भूसुरुंग पेरून ठेवले होते. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास सालेकसा पोलिसांची क्वालिस गाडी बेवारटोला जाण्यासाठी निघाली. खोलगड परिसरात जाताच रस्त्यावर खोदकाम केलेले पोलिसांना दिसले. या जागेची तपासणी केली. मात्र, संशयास्पद काहीही आढळले नाही. पोलिसांचे वाहन बेवारटोलाकडे रवाना होताच जमिनीत पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट झाला. यात क्वालीस गाडी उंच उडून जमिनीवर आदळली. क्षणाधार्थ पोलिसांचे शव सर्वत्र विखुरले गेले. या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दोन पोलीस शिपायांचे नशीब बलवत्तर होते. सुरुंग स्फोटात २५ फूट उंच उडून खाली आदळलेल्या क्वालिसचा चेंदामेंदा झाला.

वाहनाच्या टीन पत्र्यात सचिन सोनुलेचे पाय अडकले. हातातील एसएलआर बंदूक पायात फसली. स्फोटातील जखमांमुळे होणाऱ्या असह्य वेदना सहन करण्याची ताकद नसताना भूसुरुंग स्फोट घडवून आणणाऱ्या नक्षल्यांचा तब्बल १५ मिनिटे घटनास्थळाच्या दिशेने गोळीबार झाला. गोळीबारानंतर तब्बल १ तास त्या नक्षलवाद्यांनी घटनास्थळावर पाहणी केली. स्फोटातील कुणीही पोलीस जवान वाचू नये हा त्यांचा मानस असावा; परंतु असह्य वेदनेची कणव येत असतानाही सचिनने आपले प्राण वाचविण्यासाठी श्वास रोखून धरला. नक्षली त्याला मृत असल्याचे गृहीत धरून तेथून निघून गेले. याच क्वालिसमधील दुसरा बलवत्तर जयेंद्र हुकरे हा घटनास्थळापासून १२ फुट अंतरावरील झुडपात फेकला गेल्याने तोही सुदैवाने बचावला.

क्वालिसच्या मागे स्फोटक ठेवलेले आणखी एक वाहन होते. हा स्फोट होताच त्या वाहनातील राममनोहर अनिल नेवारे यांनी नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार करून आपला बचाव करीत बेवारटोला येथील प्रकल्पावर गेला. तेथील मजुरांमध्ये मिसळून त्यांनी एका मजुराच्या मदतीने दरेकसा एओपीला माहिती दिली. सायंकाळी ४ वाजता घडलेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या सचिनने तडफडत तिथेच ६ तास काढले. तब्बल ७ व्या तासाला सचिन व जयेंद्रला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय हलविण्यात आले. सचिनच्या जवळ तासभर फिरणाऱ्या नक्षलवाद्यांना तो जिवंत असेल अशी कल्पनाही आली नसावी.

या घटनेतून सचिन मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडला. जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा भूसुरुंग स्फोट होता. त्या स्फोटाचे नाव घेताच आजही थरकाप उडतो. या स्फोटातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्याची शपथ जिल्हा पोलिसांनी घेतली आहे.

बॉक्स

हे वीर शहीद चिरकाल स्मरणात

या स्फोटात उपनिरीक्षक वामन गाडेकर (क्रांती चौक औरंगाबाद), किरणकुमार धोपडे (३८, रा. महावीरनगर, नागपूर), पोलीस शिपाई भोजराज बाभरे (२४, रा. पोलीस लाइन, गोंदिया), सागर राऊत (२४, सेलटॅक्स कॉलनी, गोंदिया), रवीकुमार जवंजाळ (२५, रा. कुंभारेनगर, गोंदिया), मूलचंद भोयर (२८, रा. सडक-अर्जुनी) व वाहन चालक शमीम अग्रवाल (रा. सिमीर, उमरेड) हे शहीद झाले होते. या वीर शहीद पुत्रांना विनम्र आदरांजली.

Web Title: ‘Bevartola’ heart throbs at the mention of the incident ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.