बेवारटोला सिंचन प्रकल्प मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:13 PM2019-02-18T22:13:30+5:302019-02-18T22:13:51+5:30
रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हे भाजप सरकारचे मुख्य ध्येय व धोरण आहे. त्यादृष्टीने राज्यात आणि देशात मागील साडेचार वर्षांत अनेक कामे करण्यात आली. या परिसरातील बेवारटोला सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. परिणामी शेकडो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर करुन हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हे भाजप सरकारचे मुख्य ध्येय व धोरण आहे. त्यादृष्टीने राज्यात आणि देशात मागील साडेचार वर्षांत अनेक कामे करण्यात आली. या परिसरातील बेवारटोला सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. परिणामी शेकडो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर करुन हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे कोया पुनेम महोत्सव व राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन आज (दि.१८) आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम, पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. अशोक नेते, आ.संजय पुराम, विजय रहांगडाले, डॉ.परिणय फुके, देवराव होळी, अशोक उईके, माजी आ.हेमंत पटले, खुशाल बोपचे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल व समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, बेवारटोला सिंचन प्रकल्पासह कुवाढास कालव्याचे काम रेल्वे विभागाच्या परवानगी अभावी अनेक वर्षांपासून रखडले असल्याची बाब आ.संजय पुराम यांनी निदर्शनास आणून दिली. खा.अशोक नेते आणि पुराम यांनी यासंबंधी कुठली अडचण आहे याचा प्रस्ताव आपल्याकडे त्वरीत सादर करावा. रेल्वे मंत्र्यांशी बोलून कुवाढास कालव्याची समस्या सुध्दा मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिली.
समस्त आदिवासी आणि गोंडी समाजबांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्रीे देवेंद्र फडणवीस यांनी विकासात्मक आराखडा तयार करुन या क्षेत्राचा सर्वांगिन विकास करण्याचे आश्वासन दिले आहे. याबद्दल आपण सुध्दा त्यांचे अभार मानतो. कचारगड तीर्थ आणि पर्यटन स्थळाच्या विकासासाठी जेवढा निधी लागेल तेवढा केंद्र व राज्याच्या माध्यमातून उपलब्ध करुन देऊन देशातील सर्वोकृष्ट पर्यटन व तीर्थस्थळ म्हणून या परिसराचा विकास करण्याची ग्वाही गडकरी यांनी दिली. ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आ.डॉ.परिणय फुके यांच्या पुढकाराने अटल आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आरोग्य विषयक सर्व तपासण्या करुन नि:शुल्क औषधे दिले जात आहे. तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांवर शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध करुन दिली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन सुध्दा त्यांनी या वेळी केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करुन देऊन त्यांचा सर्वांगिन करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरु आहेत.
यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. गोंडी संस्कृती फार प्राचीन असून या संस्कृती आणि वारसाचे जतन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने निश्चितच उपाय योजना करण्यात येईल अशी ग्वाही दिली. या वेळी राजकुमार बडोले, संजय पुराम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी मांडले.
अटल आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांची तपासणी
कोया पुनेम महोत्सवानिमित्त कचारगड येथे आयोजित यात्रेचे औचित्य साधून आ.डॉ.परिणय फुके यांच्या पुढाकाराने व जिल्हा आरोग्य व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने अटल आरोग्य शिबिर सोमवारी (दि.१८) कचारगड येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नि:शुल्क आरोग्य तपासणी व उपचाराची सोय एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात आली होती. यात हजारो रुग्णांची आरोग्य तपासणी करुन उपचार व नि:शुल्क औषधांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे प्रथमच यात्रा स्थळी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल्याने अनेक रुग्णांना मदत झाली.