सावधान.... डेंग्यूचा व्हायरस बदलतोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:34 AM2021-09-24T04:34:43+5:302021-09-24T04:34:43+5:30
गोंदिया : जिल्ह्यात मागील महिन्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. गोंदिया, सालेकसा या भागात ...
गोंदिया : जिल्ह्यात मागील महिन्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. गोंदिया, सालेकसा या भागात डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळले होते. मात्र, आरोग्य विभागाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे ही या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव आता आटोक्यात आला. गोंदिया जिल्ह्यात डेंग्यूचे टाइप १ आणि ३ चे रुग्ण अधिक आढळत होते. मात्र, यंदा प्रथमच जिल्ह्यात डेंग्यूचे टाइप २ प्रकाराचे रुग्ण आढळले. त्यामुळे डेंग्यूचा व्हायरस आता बदलत असून नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. दोन ते तीन दिवस ताप असल्यास अथवा डेंग्यूच्या संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसत वेळीच जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करून घ्यावा. डेंग्यूच्या टाइप २ च्या रुग्णांचे प्रमाण जिल्ह्यात कमी असले तरी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर वेळीच सावध होत उपचार घेण्याची गरज आहे.
..........
जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण
जानेवारी ते ऑगस्ट : १२२
१ ते २२ सप्टेंबर : १५
.............
हे बदल काळजी वाढविणारे
ताप नसताना पॉझिटिव्ह
ताप, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, खाज सुटणे, अशक्तपणा वाटणे ही डेंग्यूची लक्षणे असली तरी लक्षणे दिसत नसताना सुद्धा डेंग्यूची चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. जिल्ह्यात सुद्धा लक्षणे नसलेले तीन ते चार रुग्ण आढळले आहे.
........
प्लेटलेट्स कमी नाही तरी पाॅझिटिव्ह
डेंग्यूची लागण झाल्यानंतर साधारणत: बऱ्याचे रुग्णांचे प्लेटलेट्स कमी होतात. मात्र, काहींना या आजाराची लागण झाल्यानंतरही त्यांचे प्लेटलेट्स कमी होत नसल्याचे डॉक्टर आणि पॅथाॅलाॅजीच्या तज्ज्ञांनी सांगितले. डेंग्यूचा २ टाइप हा प्रकार थोडा धोकादायक आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.
........
टाइपचे २ चे प्रमाण कमी
डेंग्यूची लागण झाल्यानंतर प्लेटलेट्स कमी होणे गरजेचे नाही. बऱ्याच रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती ही चांगली असते त्यामुळे अशा रुग्णांचे प्लेटलेट्स कमी होत नसतात. प्लेटलेट्स चांगले असणाऱ्यांचा पण डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह येऊ शकते. असे बऱ्याच रुग्णांचे रिपोर्ट तपासल्यानंतर पुढे आले आहे.
- तपन उजवणे, पॅथाॅलॉजिस्ट
...............
संसर्ग आटोक्यात
जिल्ह्यात डेंग्यूचे टाइप १ आणि ३ चे अधिक रुग्ण आढळत होते. मात्र, यंदा टाइप २ च्या रुग्णांमध्ये थोडी वाढ झाली आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाचा संसर्ग आटोक्यात असून आरोग्य विभागातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत.
- डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक
.................