लॉटरी लागल्याचा ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:32 AM2021-08-19T04:32:12+5:302021-08-19T04:32:12+5:30
गोंदिया : आजघडीला ऑनलाईन लॉटरी लागल्याच्या नावावर लोकांची फसवणूक होत आहे. आपल्याला झटपट पैसा कमविण्याचे आमिष देत, ‘कौन बनेगा ...
गोंदिया : आजघडीला ऑनलाईन लॉटरी लागल्याच्या नावावर लोकांची फसवणूक होत आहे. आपल्याला झटपट पैसा कमविण्याचे आमिष देत, ‘कौन बनेगा करोडपती’चे स्वप्न दाखवून गंडविले जात आहे. अशाप्रकारचे मेसेज व ई-मेल लोकांना पाठविले जात आहेत. यापासून सावधान राहण्याची गरज आहे. आपल्याला लॉटरी लागल्याचे सांगून त्यासाठी आधार कार्ड व बँकेची सर्व माहिती मागितली जाते. लोकांना झटपट पैसा कमविण्याचा नाद लागला आहे. कष्ट न करता अधिक पैसा कसा मिळवायचा, याच नादात असलेले लोक यात अडकत आहेत. आमिषला बळी पडून स्वत:चीच फसवणूक करून घेत आहेत. महागड्या वस्तूंची किंवा मोठ्या रकमेची लॉटरी लागल्याचे मेसेज किंवा ई-मेल पाठवून लोकांना गंडविले जात आहे. अशाप्रकारच्या भूलथापांना बळी पडलेल्या महिलांनी ती वस्तू मिळविण्याच्या आमिषाला बळी पडून त्यांना टॅक्सच्या रूपात पाच हजार ते १५ हजारांपर्यंत रक्कम दिल्याचे अनेक उदाहरणे गोंदिया जिल्ह्यात आहेत.
...............................
फिशिंग ई-मेल
- फिशिंग ई-मेलचा वापर लोकांना फसविण्यासाठी केला जात आहे. फिशिंग ई-मेल फ्रॉड असलेला ई-मेल आहे. त्याच्या माध्यमातून तो मेल साध्या मेलसारखाच दिसतो. एखाद्या कंपनीने तर हा मेसेज पाठविलेला नाही, असे आपल्याला वाटू शकते. त्यासाठी सावध राहा.
- युजरकडे फिशिंग ई-मेलच्या माध्यमातून पर्सनल डिटेल्स, फायनान्सीयल माहिती मागितली जाते. त्या मेलवर आपली माहिती गेल्यास सर्व डेटा चोरी होतो. यातून आपल्याला आर्थिक फटकाही बसू शकतो.
...................
ही घ्या काळजी
-लाॅटरी लागल्याचा संदेश आल्यास तो डिलिट करा, फसवे ई-मेल्स आले, तर त्याकडे कानाडोळा करा. अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.
- ई-मेलमध्ये असलेली कोणतीही लिंक ओपन करू नका, अन्यथा आपल्याला गंडा बसेल.
- आपली माहिती कुणालाही देऊ नका, लॉटरी लागल्याच्या मेसेजला उत्तर दिल्यास आपली फसवणूक होऊ शकते.
..................
वेबसाईटवरची सुरुवात ‘एचटीटीपीएस’ पासून झाली आहे का?
- आपल्या संपर्काशी एचटीटीपीएसचा संबंध नसला, तरी वेबसाईटचे एचटीटीपीएसच्या मदतीने संरक्षण केले पाहिजे.
- एचटीटीपीएस आपल्या वेबसाईटची गोपनीयता व वापरणाऱ्यांची अखंडता यांचे संरक्षण करते.
- सोबतच वेब प्लॅटफाॅर्मची नवीन शक्तिशाली वैशिष्टे्यही एचटीटीपीएस वापरण्याच्या साईटपुरती मर्यादित आहे.
..............
केस
१) एका ४५ वर्षीय महिलेला कारची लॉटरी लागल्याचा मेसेज आला. त्या मेसेजच्या खाली मोबाईल क्रमांक होता. त्यावर त्यांनी संपर्क केला असता, त्यांना अभिनंदन करून ती कार डिलिव्हरी करण्यासाठी टॅक्सच्या रूपात आधी १० हजार रुपये बॅंकेत जमा करावे लागतील, असे सांगितले. त्यांनी १० हजार रुपये जमा केल्यावर त्यांना कार मिळाली नाही. त्यांनी त्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु मोबाईल बंद झाला.
.....
२) एका ५५ वर्षीय गृहस्थाला लॉटरीतून फ्रीज लागल्याचा मॅसेज मिळाला. त्या मेसेज पाठविणाऱ्या क्रमांकाशी संपर्क केल्यावर दोन हजार रुपये ट्रान्सपोर्ट चार्ज गुगल-पे किंवा फोन-पे करा, असे सांगण्यात आले. त्यांनी पैसे पाठविल्यावर त्यांना काहीच देण्यात आले नाही.