जिल्ह्यात डेंग्यूचा धोका वाढला काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:31 AM2021-08-27T04:31:49+5:302021-08-27T04:31:49+5:30
गोंदिया : शहरात डेंग्यू व हिवताप रुग्ण संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता जिल्हा हिवताप कार्यालयाकडून बुधवारपासून (दि.२५) शहरातील ...
गोंदिया : शहरात डेंग्यू व हिवताप रुग्ण संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता जिल्हा हिवताप कार्यालयाकडून बुधवारपासून (दि.२५) शहरातील प्रत्येक वाॅर्डात डेंग्यू प्रतिसाद व शोध मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या मंगळवारपर्यंत (दि.३१) ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत आशा कार्यकर्ता घरोघरी जाऊन ताप, कंटेनरचे सर्व्हे करून लोकांमध्ये कीटकजन्य व जलजन्य आजारांविषयी जनजागृतीचे काम करीत आहेत. कोणताही ताप हिवताप असू शकतो यामुळे ‘लवकर निदान-तत्काळ उपचार’ या उक्तीप्रमाणे ताप आलेल्या रुग्णांचे हिवतापाकरिता रक्त नमुने घेऊन तत्काळ निदान आरडीके किटद्वारे केले जात आहे. जनतेच्या सहभागानेच कीटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य असून याकरिता आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या डेंग्यू शीघ्र शोध मोहिमेला जनतेनी सहकार्य करावे, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी कळविले आहे.
--------------------------
नागरिकांनी काय करावे
आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा, म्हणजे घरातील पाण्याची सर्व भांडी घासून पुसून कोरडे करून ठेवायचे. ड्रम, कुलर, पाण्याच्या टाक्या, रांजन, माठ, फुलदानी, रिकामे पडलेले टायर, नारळाच्या करवंट्यांमध्ये पाणी साचू द्यायचे नाही, झोपताना नियमित मच्छरदानीचा वापर करावा, शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बांधावी, ताप आल्यास जवळच्या दवाखान्यात जाऊन तत्काळ रक्त तपासणी करून उपचार घ्यावा व कोणताही ताप अंगावर काढू नये. घराबाहेर साचलेल्या पाण्यामध्ये गाडीचे जळलेले इंजीन ऑईल टाकावे.