सावधान... लग्न समारंभावर राहणार पोलिसांची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:25 AM2021-04-05T04:25:55+5:302021-04-05T04:25:55+5:30
केशोरी : जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवूनही ग्रामीण भागात लग्न समारंभ ...
केशोरी : जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवूनही ग्रामीण भागात लग्न समारंभ मोठ्या थाटामाटात धूमधडाक्याने करून कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. लग्नसमारंभ ५० वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे निर्देश असतानाही लोक ऐकत नाहीत. विनाकारण गर्दी करुन कोरोना संसर्ग वाढवित आहेत. आता गावात होणाऱ्या लग्न समारंभावर पोलीस करडी नजर ठेवणार आहेत.
कोरोनाचे नियम मोडणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी जिल्ह्यातील विभागप्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येवर आळा कसा बसविता येईल यावर विचारविनिमय करण्यात आला. रुग्णसंख्या वाढीचे प्रमुख कारण म्हणजे लग्न समारंभातून होणारी गर्दी हेच आहे. गावपातळीवर कोरोना संसर्गाला आळा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या यंत्रणाचे कोणीही ऐकत नाही. साधारण कुटुंब प्रमुख देखील आपल्या मुला-मुलींचे लग्न धूमधडाक्याने आटोपत आहेत. कोणीही शासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम पाळत नाही अशीच स्थिती राहिली तर कोरोना महामारी उग्ररुप धारण केल्याशिवाय राहणार नाही. ही बाब लक्षात घेऊन लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक वऱ्हाडींची उपस्थिती ठेवणाऱ्या कुटुंब प्रमुखांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्यामुळे ही जबाबदारी आता पोलीस विभाग पार पाडणार आहे. गावात होणाऱ्या लग्न समारंभावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. लग्नसमारंभात गर्दी करण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या दोन्ही बाजूच्या कुटुंब प्रमुखास जबाबदार धरुन पोलीस कारवाई केली जाणार आहे.