बीजीडब्ल्यूची इमारत स्ट्रक्चर आॅडिटमध्ये फेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:20 PM2018-10-24T22:20:18+5:302018-10-24T22:20:51+5:30
येथील बाई गंगाबाई महिला (बीजीडब्ल्यू) रूग्णालयाची इमारत फार जुनी असून ती आता जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात या इमारतीत पावसाचे पाणी साचल्याने रुग्णांचे हाल झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला (बीजीडब्ल्यू) रूग्णालयाची इमारत फार जुनी असून ती आता जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात या इमारतीत पावसाचे पाणी साचल्याने रुग्णांचे हाल झाले होते.
दरम्यान या प्रकारानंतर प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर प्रशासनाने बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट केले. यात रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली ती पाडण्याची गरज असल्याचे म्हटले.
त्यामुळे लवकरच ही इमारत पाडून नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकमेव शासकीय महिला व बाल रुग्णालय म्हणून बीजीडब्ल्यू रुग्णालय ओळखले जाते. जिल्ह्यासह जिल्हाबाहेरील महिला रुग्ण येथे उपचारासाठी येतात.
या रूग्णालयाच्या बाह्यरुग्ण तपासणी विभागात दररोज चारशे ते पाचशे रुग्णांची तपासणी केली जाते. या रूग्णालयाच्या इमारतीला फार वर्ष झाली असून ही इमारत जीर्ण झाली आहे. या वर्षी पावसाळ्यात दोनदा रुग्णालयाच्या प्रसुती वार्डात गुडघाभर पाणी साचले होते.
त्यामुळे येथे दाखल असलेल्या महिला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रात्र जागून काढावी लागली होती. दरम्यान ही बाब लोकमतने लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गांर्भियाने दखल घेत जिल्हा प्रशासनाला यावरुन चांगलेच फटकारले होते. तसेच या रुग्णालयात सुधारणा करुन गैरसोयी दूर करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने थोडीफार दुरूस्ती केली होती. मात्र रुग्णालयाची इमारत फार जुनी असल्याने इमारतीचे नागपूर येथील व्हीएनआयटीकडून स्ट्रक्चर आॅडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार व्हीएनआयटीने इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट केले त्यात इमारत जीर्ण झाली असून इमारतीचा पाया सुध्दा योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही इमारत पाडण्याचा निर्णय झाला. लवकरच या कामाला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
स्थानांतरणाच्या हालचाली सुरू
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असून त्यासाठी इमारतीचे बांधकाम केले जात आहे. बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या शेजारीच एक इमारत तयार करण्यात आली आहे. या इमारतीचे सर्वच कामे आटोपले असून याच इमारतीत बीजीडब्ल्यू रुग्णालयाचे स्थानांतर करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने हालचाली सुध्दा सध्या सुरू आहे.
बीजीडब्ल्यू रुग्णालयाची जुनी जीर्ण इमारत पाडून त्या ठिकाणी दुसरी इमारत उभारण्यात येणार आहे. तसेच तोपर्यंत याच रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या इमारतीत बीजीडब्ल्यू रुग्णालयाचे स्थानांतर करण्यात येईल.
-व्ही.पी.रुखमोडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.