बहेकार यांना राज्यस्तरीय जैवविविधता पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 09:45 PM2018-06-02T21:45:20+5:302018-06-02T21:45:31+5:30
अंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रा जैवविविधता मंडळातर्फे सावन बहेकार यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश भारती डोंगरे व नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या हस्ते नागपूर येथे सन्मानीत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रा जैवविविधता मंडळातर्फे सावन बहेकार यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश भारती डोंगरे व नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या हस्ते नागपूर येथे सन्मानीत करण्यात आले.
बहेकार गेल्या १८ वर्षापासून वन्यजीव व पर्यावरन संरक्षणासाठी गोंदिया जिल्ह्यात तसेच लगतच्या बालाघाट, भंडारा येथे काम करीत आहेत. ते उच्चशिक्षीत असून ते या सामाजिक क्षेत्रात सतत आपली सेवा देत आहेत. गेल्या दशकापासून सारस पक्षी संवर्धन-संरक्षणाकरिता लोकसहभागातून उल्लेखनीय कार्य करीत आहेत. अतिसंरक्षीत सारस पक्षी हा संपूर्ण महाराष्ट्रात फक्त गोंदिया जिल्ह्यातच अस्तित्वात आहे हे सावन व त्यांच्यासोबती कार्यकर्त्यांमुळेच संभव झालेले आहे.
काळवीट संरक्षण असो की लांडग्यावर सनियंत्रण (मॉनिटरींग) उपलब्ध जैवविविधता संसाधनांचे संरक्षण व त्याचे पुनरुज्जीकरण (रिस्टोरेशन), व्याघ्र संरक्षण असो की वाघांच्या हालचालींवर संनियंत्रण ठेवून वाघांच्या भ्रमणमार्गाचा अभ्यास करणे, अवैध शिकारीवर आळा घालण्याकरिता वन विभागासोबत सतत कार्य करणे हे सर्व कार्य बहेकार पुढाकार घेऊन करीत आहेत.
जिल्ह्यात अनेक तलाव असून तलावांच्या संरक्षणासाठी व त्यातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी व जैवविविधतेचे पुनरुज्जीकरणाकरिता ते महत्वाची भूमिका पार पाडत आहे. पर्यावरण व वन्यजीव संरक्षणाकरिता क्षेत्रामध्ये कार्य करीत असलेल्या सेवा संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहे. याआधी त्यांना त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र युथ आयकॉन २०१४ व महाराष्ट्र वाईल्डलाईफ अवार्ड २०१५ असे सेंच्युरी एशिया अवार्ड मिळाले आहेत. शिवाय मानद वन्यजीव रक्षक म्हणून २०१२-२०१७ पर्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे.
तसेच जिल्हा पर्यटन समिती, जिल्हा व्याघ्रकक्ष समिती, जिल्हा जैवविविधता समितीतही सदस्य म्हणून ते कार्य करीत आहेत. बहेकार यांच्या सम्मानाबद्दल भरत जसानी, मुनेश गौतम, अविजीत परिहार, गौरव तुरकर, अंकीत ठाकुर, शशांक लाडेकर, दुष्यंत रेभे, अपूर्व मेठी, विप्लोव जायस्वाल, दुष्यंत आकरे, निलेश कोठारी, विकास फरकुंडे यांनी त्यांचे कौतूक केले आहे.