सुनील मेंढे झाले भंडारा-गोंदियाचे खासदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:39 PM2019-05-24T23:39:42+5:302019-05-24T23:41:05+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ११ एप्रिलला पार पडल्यानंतर तब्बल ४२ दिवसांनी गुरूवारी (दि.२३) मतमोजणी घेण्यात आली.त्यामुळे १७ व्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचा खासदार कोण होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले होते. भाजपचे सुनील मेंढे यांनी ६ लाख ५० हजार २४३ मते घेत विजय संपादित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ११ एप्रिलला पार पडल्यानंतर तब्बल ४२ दिवसांनी गुरूवारी (दि.२३) मतमोजणी घेण्यात आली.त्यामुळे १७ व्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचा खासदार कोण होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले होते. भाजपचे सुनील मेंढे यांनी ६ लाख ५० हजार २४३ मते घेत विजय संपादित केला. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८४९ मते या निवडणुकीत मिळाले असून सुनील मेंढे यांचा १ लाख ९७ हजार ३९४ मताधिक्यांनी विजय झाला. त्यामुळे या मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे ठरले.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरूवारी सकाळी ८ वाजता सुरू होवून मध्यरात्री संपली. तब्बल ३३ फेऱ्या मतमोजणीच्या पार पडल्या.प्रत्येक फेरीत भाजपाचे सुनील मेंढे आघाडी घेत असल्याने दुपारीच विजयाचे चित्र स्पष्ट झाले होते. मात्र अंतीम निकाल रात्री २.१५ मिनिटानी घोषित झाला. त्यानंतर विजयी उमेदवार भाजपाचे सुनील मेंढे यांना जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी निवडणूक निरीक्षक पार्थ सारथी मिश्रा, उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी उपस्थित होते.
या निवडणुकीत भाजपाचे सुनील मेंढे यांना ६ लाख ५० हजार २४३, राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८४९, बसपाच्या डॉ. विजया नंदुरकर यांना ५२ हजार ६५९, वंचित बहुजन आघाडीचे कारू नान्हे यांना ४५ हजार ८४२, पिपल्स पार्टी आॅफ इंडिया डेमाक्रॉटीकचे भीमराव बोरकर यांना १ हजार ४६८, भारतीय शक्तीचेतना पार्टीचे भोजराज मरस्कोल्हे यांना ९०५ मते तर अपक्ष निलेश कलचुरी यांना ५४७, प्रमोद गजभिये, ९८०, मिलिंदकुमार जैस्वाल २ हजार ६९९, देविदास लांजेवार १ हजार ५४९, राजेंद्र पटले १३ हजार १४५, डॉ. सुनील चवळे १ हजार ५०७, सुमीत पांडे यांना ३ हजार ३१, सुहास फुंडे यांना ६ हजार ९८३ मते मिळाली. या निवडणुकीत अपक्षांमध्ये सर्वाधिक राजेंद्र पटले यांना १३ हजार १४५ मते मिळाली. १४ उमेदवारांमध्ये आठ अपक्ष उमेदवारांनी आपले भाग्य अजमावले. या आठ अपक्ष उमेदवारांच्या एकूण मतांची बेरीज ३४ हजार ४४४ होते.
विशेष म्हणजे सुनील मेंढे व नाना पंचबुद्धे वगळता सर्व १२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात भाजपचे सुनील मेंढे यांना ५२.२३ टक्के तर राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना ३६.३८ टक्के मते मिळाली होती. गत २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार नाना पटोले यांना ५०.६२ टक्के तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना ३८.१६ टक्के मते मिळाली होती.
सहाही मतदारसंघात सुनील मेंढे यांची मुसंडी
भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांनी सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली. सर्वाधिक आघाडी भंडारा विधानसभेत मिळाली. मेंढे यांना १ लाख ३२ हजार ९ मते तर पंचबुद्धे यांना ७७ हजार ४५६ मते मिळाली. भंडारा विधानसभेत ५४ हजार ५५३ मतांची आघाडी मिळाली. भाजपाला तुमसर विधानसभा क्षेत्रात ३६ हजार ६५७, साकोलीत ३२ हजार ४३६, अर्जुनी मोरगाव १५ हजार ९९, तिरोडा २० हजार ७०७, गोंदिया ३८ हजार ४१६ मतांची आघाडी मिळाली.
दहा हजारावर मतदारांची उमेदवारांना नापसंती
लोकसभा निवडणुकीत १० हजार ५२४ मतदारांना १४ पैकी कोणताही उमेदवार पसंत नसल्याने त्यांनी नोटाचे बटन दाबले. त्यात ई बॅलेटचे दहा आणि पोस्टल बॅलेटचे १०२ मतदार आहेत.
नाना पंचबुद्धे यांना सर्वाधिक पोस्टल मते
लोकसभा निवडणुकीत पोस्टल बॅलेटमध्ये मात्र मतदारांनी राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना पसंती दिली. त्यात पंचबुद्धे यांना ४ हजार ३५८, मेंढे यांना ३ हजार ७१ मते मिळाली. ९ हजार १३४ मतदारांनी पोस्टल बॅलेटने मतदान केले. त्यापैकी १०२ मतदारांनी नोटाला मत दिले. तर १ हजार १७३ मते अवैध ठरली.