भाऊबीजने दिली एसटीला ३९ लाख रुपयांची ओवाळणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 02:17 PM2023-11-17T14:17:15+5:302023-11-17T14:18:23+5:30
सण उत्सवानिमित्त वाढली बसेसमध्ये गर्दी : एसटीच्या उत्पन्नात वाढ
गोंदिया : दिवाळी आणि भाऊबीजेनिमित्त गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेकांकडून प्रवासाचा बेत आखण्यात येत आहे. यामुळे रेल्वे आणि एसटी हाऊसफुल धावत असून, बुधवारी (दि.१५) भाऊबीजेनिमित्त भाऊरायास ओवाळायला सासुरवाशिणी बहिणींची पावले माहेराकडे वळल्याचे चित्र पाहावयास मिळाले. हिंदू संस्कृतीमध्ये सर्वांत मोठा सण म्हणून दिवाळीचे महत्त्व अबाधित आहे. दिवाळीपूर्वीच परीक्षा आटोपती घेऊन शाळांना सुट्या दिल्या जातात. त्यामुळे मुलांच्या शाळेची चिंता राहत नसल्याने मामाच्या गावाला किंवा पर्यटकीय, प्रेक्षणीय स्थळांना या काळात भेटी देण्याचा बेत आखला जातो. प्रशासकीय सेवेत कार्यरत अधिकारी-कर्मचारीही सुट्या घेऊन दिवाळीचा आनंद अनुभवतात.
सुरक्षित प्रवासाकरिता आजही रेल्वे आणि एसटीलाच प्राधान्य दिले जात असून दिवाळी काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता प्रत्येक मार्गावर जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यातूनच गोंदिया आगाराने १० ते १५ नोव्हेंबर या काळात तब्बल ३८ लाख ९७ हजार १२४ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
तिकीटदरात १० टक्के वाढीचा परिणाम नाही
- दिवाळी काळात सर्वच मार्गांवर प्रवाशांची गर्दी वाढलेली असते. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने काही दिवसांपूर्वी एसटीच्या तिकीटदरात सरसकट १० टक्क्यांनी वाढ केली. मात्र, त्याचा प्रवाशांवर विशेष परिणाम झाला नसून एसटी बसनेच प्रवास करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.
सहा दिवसांत ३८.९७ लाख आगाराच्या तिजोरीत
- धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होते. त्यानुसार यंदा शुक्रवारपासून (दि.१०) दिवाळीला सुरुवात झाली, तर बुधवारी (दि.१५) भाऊबीज आटोपली. दिवाळीच्या या सहा दिवसांच्या काळात गोंदिया आगाराने ३८ लाख ९७ हजार १२४ रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, भाऊबीजेनंतर आणखी प्रवासी संख्या वाढते, अशी माहिती मिळाली.
चोरटे साधू शकतात डाव, पर्स आणि दागिने सांभाळा
- दिवाळी, भाऊबीज काळात एसटी आणि रेल्वेगाड्यांमध्ये विशेषतः महिला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ही बाब हेरून पाकीटमार, भुरटे चोर सक्रिय होतात. महिलांच्या पर्स आणि दागिन्यांवर त्यांची चोरटी नजर असते.
त्यामुळे गर्दीच्या प्रसंगी एसटी किंवा रेल्वेतून चढउतार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असा सल्ला पोलिसांकडून दिला जात आहे.
दिवाळी, भाऊबीज काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दुप्पट ते तिपटीने वाढ होत असते. ही बाब लक्षात घेऊन जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
- संजना पटले, आगारप्रमुख, गोंदिया
अशा वाढविल्या आहेत फेऱ्या
गाव- फेऱ्या
- नागपूर- ८
- देवरी-८
- अर्जुनी-मोरगाव-६
- सालेकसा-६
- अकोला- १