बावनकुळे, फुकेंच्या शिस्तबद्ध बांधणीने मेंढे पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:34 PM2019-05-25T22:34:14+5:302019-05-25T22:35:11+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील मेंढे यांचा तब्बल १ लाख ९७ हजार विक्रमी मतांनी विजय झाला. त्यांच्या विक्रमी विजयामागे खरी भूमिका होती ती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आ.डॉ.परिणय फुके यांची.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील मेंढे यांचा तब्बल १ लाख ९७ हजार विक्रमी मतांनी विजय झाला. त्यांच्या विक्रमी विजयामागे खरी भूमिका होती ती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आ.डॉ.परिणय फुके यांची. निवडणुकीच्या काळात अडीच महिने त्यांनी मतदारसंघात तळ ठोकून केलेली पक्ष बांधनी आणि भाजप सरकारने केलेल्या विकास कामांचे योग्य मार्केटिंग केल्यामुळेच मेंढे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. एकंदरीत बावनकुळे आणि मेंढे यांनी निवडणुकी दरम्यान केलेली शिस्तबध्द बांधणी व नियोजन केल्याने मेंढे यांना विक्रमी मताधिक्य मिळविता आले.
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने जिंकलेली भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा भाजपाने पुन्हा आपल्या पदरात पाडून घेतली. यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार डॉ. परिणय फुके यांचे यशस्वी नियोजन महत्त्वपूर्ण ठरले. आता त्यांचे लक्ष मतदार संघातील सहाही विधानसभेकडे लागले आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच नवख्या उमेदवारांना रिंगणात उतरविले होते. सुरुवातीला विधान परिषदेचे आमदार डॉ.परिणय फुके यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यांनी भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी केली. एवढेच नाही तर त्यांना विजयी करण्याची जबाबदारी घेत वरिष्ठांनाही खात्री करुन दिली. त्यावरूनच भाजपने भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने माजी शिक्षण राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना मैदानात उतरविले. भाजपाने सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध पद्धतीने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात प्रचार यंत्रणा राबविली. गोंदिया जिल्ह्यातील प्रचाराची धुरा आमदार डॉ.परिणय फुके यांनी तर राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भंडाराचे पालकमंत्री असल्याने त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या दोघांनीही भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रचाराचे नियोजन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचेही उत्कृष्ट नियोजन करून तेथे गर्दी खेचून आणण्यात यश मिळविले.त्याचाच परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या विजयात झाला. विशेष म्हणजे मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपलाच आघाडी मिळाली.
शहरी आणि ग्रामीण भागातही मतदारांना आकर्षीत करण्यात भाजपला यश आल्याचे या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून येत आहे. सुनील मेंढे यांच्या विजयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार डॉ.परिणय फुके यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने या निवडणुकीत मन लावून काम केल्याने भाजपला ही निवडणूक सोपी झाली. आता या विजयाने भाजपचा आत्मविश्वास वाढला असून मतदारसंघातील सहाही विधानसभा जिंकण्याचा त्यांनी मनोदय केला आहे.
कार्यकर्त्यांशी योग्य समन्वय
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार डॉ.परिणय फुके यांनी प्रचारादरम्यान संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. मतदारांशी थेट संपर्क वाढविला. भाजपच्या विकासात्मक योजनांची माहिती त्यांनी गावागावांत दिली. नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळत गेला. मतदानाच्या दिवशी सुद्धा बुथनिहाय कार्यकर्त्यांना कामाला लावले. अधिकाधिक मतदान कसे करता येईल याकडे त्यांनी लक्ष दिले. परिणामी सुनील मेंढे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यांच्याच प्रयत्नांमुळेच मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रात आघाडी घेतली. भाजपची प्रचार यंत्रणा तशी सक्षमच होती. मात्र पालकमंत्री बावनकुळे आणि आमदार फुके यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत केला. कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत मन लावून प्रचार केला.भाजपला मिळालेल्या यशाच्या विविध कारणात शिस्तबद्ध प्रचार हे महत्त्वाचे कारण होय.