विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरच केले घराच्या बांधकामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 05:00 AM2022-03-23T05:00:00+5:302022-03-23T05:00:21+5:30
गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेली १०६ कुटुंब मागील पंधरा वर्षांपासून पुनर्वसनाची वाट पाहत आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा जिल्हा प्रशासन व बिरसी विमानतळ प्राधिकरणाला अनेकदा निवेदन दिले. पण, त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आले नाही. परिणामी त्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. आपल्या हक्काचा निवारा हिरावल्याने मागील पंधरा वर्षांपासून झोपड्यांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खातिया : मागील पंधरा वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्या नावावर वेळ मारुन नेण्याच्या धोरणामुळे कंटाळलेल्या बिरसी येथील १०६ प्रकल्पग्रस्तांनी कंटाळून अखेर मंगळवारी (दि. २२) बिरसी विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरील मोकळ्या जागेवर घराच्या बांधकामाचे भुमिपूजन करुन कामाला सुरुवात केली. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला होता.
गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेली १०६ कुटुंब मागील पंधरा वर्षांपासून पुनर्वसनाची वाट पाहत आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा जिल्हा प्रशासन व बिरसी विमानतळ प्राधिकरणाला अनेकदा निवेदन दिले. पण, त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आले नाही. परिणामी त्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. आपल्या हक्काचा निवारा हिरावल्याने मागील पंधरा वर्षांपासून झोपड्यांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. पण, या घरांची स्थितीसुद्धा आता बिकट झाली असून, ते केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर दुसरीकडे या प्रकल्पग्रस्तांना शासनाने घरे बांधण्यासाठी प्लाॅट उपलब्ध करून दिले नाहीत, तर ते कधी उपलब्ध करून देणार,
याबाबत कुठलेच आश्वासन दिले नाही. त्यामुळे अजून किती दिवस असे जीवन जगायचे, असा सवाल करीत प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरील जागेवर घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करुन कामाला सुरुवात केली. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबीयसुध्दा उपस्थित होते. मात्र, यानंतरही प्रशासनातर्फे कुठलीच हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे बुधवारपासून विमानतळाच्या परिसरात टेंट उभारुन त्यात राहण्यास सुरुवात करू, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
सर्व लोकप्रतिनिधींची केवळ पोकळ आश्वासने
- विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेल्यांना मागील पंधरा वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासने देऊन वेळ मारुन नेली जात आहे. त्यामुळे या दोघांवर आता आपला विश्वास राहिला नसल्याचे सांगत प्रकल्पग्रस्तांनी संताप व्यक्त केला. तसेच यापुढची लढाई स्वत:च्या भरवशावर लढू, असे सांगितले.
प्रकल्पग्रस्तांना प्लाॅट देण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अद्याप आमचे पुनर्वसन झाले नाही. घरे बांधण्यासाठी जागा केव्हा उपलब्ध करून देणार, हे अद्याप प्रशासनाने स्पष्ट सांगितले नाही. त्यामुळे याबाबत प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा.
- प्रकल्पग्रस्त