केबीसीने बदलला 'त्याच्या' आयुष्यातील पानाचा रंग; पानटपरीवाल्याने रचला स्वप्नांचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2022 04:18 PM2022-12-03T16:18:45+5:302022-12-03T17:04:36+5:30
जिल्ह्याचा केला नावलौकिक
संतोष बुकावन
अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : बुद्धिचातुर्य आहे; पण ते प्रदर्शित करण्यासाठी मंच नाही. आज ना उद्या दिवस पालटतील, ही त्याच्यात नवी उमेद, त्याने केबीसीत सहभाग नोंदवला. एके दिवशी मोबाइलवर कॉल आला. विश्वास बसेना; पण तो खरा ठरला. त्याच्यासाठी हा अद्भूत व न भूतो न भविष्यती असा सुखद क्षण होता. होय हे काल्पनिक कथानक नाही तर सत्य आहे.
बाराभाटी या खेडेगावातील द्वारकाजीत मंडले हा केबीसीत बिगबी अमिताभ बच्चन यांच्यासोबत बुद्धिचातुर्याचा खेळ खेळला. त्याने चक्क साडेबारा लाख रुपये जिंकले अन् त्याचे आयुष्यच बदलले. त्याने अर्जुनी मोरगाव तालुक्याचा देशभरात नावलौकिक केला. हा गोंदिया जिल्ह्याचा केबीसीमध्ये भाग घेणारा पहिलाच स्पर्धक असल्याचे बोलले जात आहे.
बाराभाटी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामीण, आदिवासी गाव. रोजगाराची साधने नाहीत. शिकूनही नोकरी मिळत नाही. व्यवसाय करण्यासाठी भांडवल नाही. शिक्षण जेमतेम, कुटुंबात आई-वडील, दोन भावंडं, पत्नी, चिमुकला मुलगा. घरात काहीच नाही. अंगावर थोडंसं कर्ज होतं. कुठून पैसा येणार, हीच विवंचना सतावत होती. काय करावे सुचेना. 'अखेर वडिलांच्या छोट्याशा हॉटेलला 'जोड म्हणून पानटपरी सुरू केली. यातून फार तर रोज दीडशे ते दोनशे रुपये मिळायचे. कसाबसा उदरनिर्वाह चालायचा अन् अखेर कौन बनेगा करोडपतीच्या रुपात देवच मदतीला धावून आला.
केबीसीच्या हॉटसीटवर बसण्याचं स्वप्न होतं. तीन-चार वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या कौन बनेगा करोडपतीमधील सिजन १४ साठी एक कॉल आला. त्यावर विश्वास बसेना. फेक मेसेजची भीती मनात होती. निवड झाल्याचा मेल आला अन् संभ्रम दूर झाला.
स्वतः आणि आणखी सोबत एका व्यक्तीसाठी नागपूर ते मुंबई विमानाचं तिकीट आलं. ९ नोव्हेंबरला सासरे विश्वेश्वर रामा कांबळे यांना सोबत घेऊन मुंबई गाठली. पहिल्यांदाच विमान प्रवास झाला. अंधेरीच्या बिंद्रा हॉटेलमध्ये थांबण्याची झकास व्यवस्था होती. शूटिंग गोरेगावला व्हायची.
सुरुवातीला फर्स्ट ऑफ फिंगर फर्स्ट खेळावं लागतं. यात १० स्पर्धक असतात. आपण ग्रामीण भागातले. इतर स्पर्धक उच्च घराण्यातील. इतर नऊजण इंग्रजीत संवाद करायचे. आपले पाहिजे तसे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाही. मनात थोडीशी भीती होतीच. प्रश्नाचं उत्तर येऊनही चुकीच्या बटणावर हात जायचा, असंही घडलं. शेवटी १० मधून ७ व्या क्रमांकावर नंबर आला.
बिग बीसमोर हॉट सीटवर बसण्याचा आनंद तर होताच; पण एवढ्या महान हस्तीसमोर काय व कसं बोलायचं, ही अनामिक भीती होती. बिग बीच्या मनोरंजनात्मक कृतीतून आत्मविश्वास वाढला. अगदी नॉर्मल झालो. प्रश्नांची उत्तरे दिली अन् साडेबारा लाख रुपये जिंकले.
अडगळीत आणणारे प्रश्न
सुरुवातीचे प्रश्न अगदी सोपे होते. दहा प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर दिली. ११ वा प्रश्न ६ लाख ४० हजारांसाठी होता. प्रश्न देवेंद्र झाझरीया पॅरालिंपि- क्समध्ये कोणता खेळ खेळतात? हा प्रश्न होता. यात ऑडिअन्स पोल जीवनप्रणालीचा वापर केला. यात जिंकलो. बारावा प्रश्न १२ लाख ५० हजारांसाठी होता. हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलिस अकादमी कोणत्या नावाने आहे? हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते. फिफ्टी फिफ्टी या जीवन प्रणालीची मदत घेतली अन् उत्तर बरोबर दिले. तेरावा प्रश्न २५ लाख रुपयांसाठी होता. ८०० पेक्षा जास्त भाषांसह जगात सर्वात जास्त जीवित भाषावाला कोणता देश आहे? हा माझ्यासाठी कठीण प्रश्न होता. शेवटच्या व्हिडीओ कॉल या जीवनप्रणालीचा वापर केला, मात्र योग्य उत्तर मिळाले नाही. अखेर खेळ सोडला व साडेबारा लाख रुपये जिंकले.
ग्राहकांना बच्चन पान देणार..
भांडवल नाही. केबीसीच्या रूपाने एक आर्थिक बळ मिळालं. आपण केलेल्या व्यवसायाला पाठ दाखवायची नाही. याच व्यवसायात भरभराट करायची. हॉट सीटवर असताना बिग बीने माझ्या तोंडात घातलेल्या पानाची चव अजूनही गेली नाही. माझ्यासाठी तो अद्भूत व न भूतो न भविष्यती असा क्षण होता. आता पान दुकानाचे केबीसी पान शॉप असे नामकरण करायचे व बच्चन पान नावाने ग्राहकाला द्यायचे.
आर्थिक परिस्थितीमुळे पत्नीचे शिक्षण व तिचे स्वप्न अधुरे राहिले आहे. ते पूर्ण करायचे आहे. उर्वरित पैसे मुलाच्या भवितव्याची तरतूद म्हणून गुंतवणूक करणार. युवकांनो अभ्यासात मेहनत करा. स्वतःत आत्मविश्वास निर्माण करा. मोबाइलचा योग्य कामासाठी वापर करा. केबीसीसारख्या बुद्धिचातुर्याच्या खेळात सहभागी होऊन ध्येयपूर्तीकडे वाटचाल करा.
- द्वारकाजित मंडले