चोख पोलिस बंदोबस्तात बिरसी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात; गावकऱ्यांमध्ये संताप
By अंकुश गुंडावार | Published: January 6, 2024 06:56 PM2024-01-06T18:56:32+5:302024-01-06T18:56:45+5:30
कामठा ते परसवाडा मार्ग बंद
खातिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळाच्या कामाला शनिवार (दि. ६) सकाळी चोख पोलिस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणात अडथळा ठरणारा परसवाडा ते कामठा मार्ग बंद करण्यात आला; मात्र हा मार्ग बंद करण्याची प्रशासन व बिरसी विमानतळ प्राधिकरणाने कुठलीही पूर्वसूचना न देता सुरुवात केली. यामुळे या परिसरातील गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. आधी पर्यायी रस्ता तयार करा नंतरच रस्ता बंद करा, अशी मागणी करीत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
बिरसी विमानतळ प्राधिकरणाने यापूर्वी ११ डिसेंबर रोजी परसवाडा-कामठा मार्ग बंद करण्यासाठी काम सुरू केले होते; पण गावकऱ्यांनी याला विरोध करीत रस्त्याचे काम खोदकाम करण्यासाठी आलेली यंत्रणा परत पाठविली होती. गावकऱ्यांचा बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणाला विरोध नाही; पण परसवाडा कामठा मार्ग बंद करण्यापूर्वी त्याला पर्यायी रस्ता तयार करून देण्यात यावा, ही गावकऱ्यांची मागणी आहे. जोपर्यंत पर्यायी रस्ता तयार करून देणार नाही तोपर्यंत हा रस्ता बंद करू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती; मात्र शनिवारी (दि.६) सकाळी बिरसी प्राधिकरण व प्रशासनाने गावकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता चोख पोलिस बंदोबस्तात परसवाडा-कामठा मार्ग बंद केला. यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, गावकऱ्यांनी पर्यायी रस्ता तयार करण्याच्या मागणीला घेऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आधी माहिती का दिली नाही, गावकऱ्यांचा आक्षेप
शुक्रवारी (दि.५) उपविभागीय अधिकारी व बिरसी विमानतळाचे संचालक यांनी परसवाडा ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट दिली. तेव्हासुद्धा त्यांनी गावकऱ्यांना परसवाडा-कामठा मार्ग बंद करण्यात येणार असल्याची कुठलीही पूर्वसूचना दिली नाही. तर पर्यायी मार्ग तयार करण्यापूर्वी आणि कुठलीही पूर्वसूचना न देता रस्ता बंद करणे अयोग्य असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
बिरसी विमानतळ प्राधिकरणाने पर्यायी मार्ग तयार केल्यानंतर कामठा-परसवाडा हा मार्ग बंद करायला पाहिजे होता; पण प्रशासनाने तसे न करता हा मार्ग बंद करून गावकऱ्यांना अडचणीत आणले आहे. बिरसी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला आमचा कुठलाच विरोध नाही; पण पर्यायी रस्ता तयार करून द्यावा, ही आमची मागणी आहे. - लखन हरीणखेडे, सामाजिक कार्यकर्ता, परसवाडा
परसवाडा-कामठा मार्ग बंद करण्यापूर्वी विमानतळ प्राधिकरणाचे पर्यायी रस्ता तयार करून दिला नाही. त्यामुळे हा पर्यायी रस्ता तयार करून देईपर्यंत गावकऱ्यांचे आंदोलन सुरू राहील.- मनोहर भावे, सामाजिक कार्यकर्ता, परसवाडा
परसवाडा-कामठा मार्ग बंद केल्याने शेतकारी, गावकरी व विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी अडचण होणार आहे. त्यांना आठ ते दहा किमीचा फेरा मारून जावे लागणार आहे. त्यामुळे आधी पर्यायी रस्ता तयार करून देणे गरजेचे आहे.- रेखा जगदीश पारधी, सरपंच ग्रा.पं., परसवाडा