निवडक तलावांवर पक्षीगणना
By admin | Published: February 3, 2017 01:33 AM2017-02-03T01:33:30+5:302017-02-03T01:33:30+5:30
पर्यावरण संतुलन तथा वन्यजीव संरक्षण क्षेत्रात कार्यरत संस्था ‘सेवा’च्या (सस्टेनिंग एनव्हायर्नमेंट अॅण्ड वाईल्ड लाईफ असेम्ब्लेज)
स्थानिक व प्रवासी पक्षी : अनेक स्वयंसेवी संस्थांचा समावेश
गोंदिया : पर्यावरण संतुलन तथा वन्यजीव संरक्षण क्षेत्रात कार्यरत संस्था ‘सेवा’च्या (सस्टेनिंग एनव्हायर्नमेंट अॅण्ड वाईल्ड लाईफ असेम्ब्लेज) पुढाकाराने वनविभाग व पर्यावरण संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्था, जिल्ह्यातील पक्षीप्रेमी तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील काही निवडक तलावांवर पक्षीगणना करण्यात आली.
यात जिल्ह्यातील परसवाडा, झिलमिली, लोहारा, झालिया, नवतलाव (कुम्हारटोली), माकडी, बाजारटोला, सिवनी, घिवारी, कटंगी, सलंगटोला, घुमर्रा (कलपाथरी), चोरखमारा व करटी नदी परिसर इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या स्वयंसेवकांची चमू बनवून पक्षी गणना करण्यात आली. यात जिल्ह्यातील निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पर्यावरण संतुलनात पृथ्वीवर आढळणारे प्रत्येक जैविक व अजैविक घटकांचा महत्वपूर्ण योगदान आहे. जैविक घटकांमध्ये पक्ष्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. नैसर्गिकरित्या जंगल व जैवविविधता वाढविण्यात पक्षी महत्वपूर्ण भूमिका साकारतात. ते वनस्पतींचे उत्तम नैसर्गिक वाहक असल्याने पर्यावरण संतुलनात त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.
हिवाळ्याच्या दिवसात हजारोंच्या संख्येने प्रवासी पक्षी तथा स्थानिक पक्षी येथील तलाव व नदीमध्ये भोजनाच्या शोधात हजारो किमीचा प्रवास करून येतात. प्रवासी पक्षी सायबेरिया, चीन, मंगोलिया, अफगानिस्तान व संपूर्ण युरोपातून येतात. येथील पोषक वातावरण तथा भोजनाची विपूलता या पक्ष्यांना येथे आकर्षित करण्यात महत्वपूर्ण भूमिका साकारतात.
या पक्ष्यांचे येथे मोठ्या प्रमाणात येणे येथील संपन्न जैवविविधतेचे सूचक समजले जात आहे. पक्ष्यांच्या आगमनाने येथील निसर्गप्रेमींना विविध पक्षांचा अभ्यास करण्याची संधी मिळते. येथील पर्यावरणासाठीही हे शुभसंकेत आहे. (प्रतिनिधी)
सहभागी होणाऱ्या संस्था व स्वयंसेवक
सेवा संस्थेकडून भरत जसानी, सावन बहेकार, मुनेश गौतम, दुष्यंत रेभे, संजिव गावडे (ठाणा इंचार्ज रावणवाडी), तटकरे (ठाणा इंचार्ज देवरी), अविजित परिहार, चेतन जसानी, शशांक लाडेकर, दुष्यंत आकरे, विकास फरकुंडे, कन्हैया उदापुरे, रितेश अग्रवाल, जलाराम बुधेवार, जैपाल ठाकूर, दीपक मुंदडा, रविंद्र वंजारी, रूची देशमुख, स्वाती डोये, गुलशन रहांगडाले, सलीम शेख, रतिराम क्षीरसागर, राहुल भावे, मंगलेश डोये, दिनेश नागरिकर, झनकलाल रहांगडाले, मधुसूदन डोये, प्रशांत डोंगरे, राकेश डोये यांनी पक्षीगणनेत सहभाग घेतला.