बिरसी विमानतळावरील प्रवासी विमानसेवा ठरली औट घटकेची !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 08:34 PM2022-10-27T20:34:45+5:302022-10-27T20:35:51+5:30
गोंदिया-इंदोर-हैदराबाद या विमानसेवेला सुरुवात करण्यात आली. त्याला प्रवाशांचासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत होता. प्लाय बिग कंपनीने ऑक्टोबरपर्यंत या विमानतळावरून विमान सेवा सुरू ठेवण्याचा करार केला. पण पाच महिन्यांच्या कालावधीतच ९ ऑगस्टपासून देखभाल दुरुस्तीच्या नावावर प्रवासी विमान वाहतूक सेवा बंद केली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील प्रवाशांसाठी ही सेवा औट घटकेची ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बिरसी विमानतळावरून जवळपास सात ते आठ वर्षांच्या कालावधीनंतर उड्डाण प्रकल्पांतर्गत १३ मार्च २०२२ पासून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ झाला होता. मात्र या विमानतळावरून ही सेवा चालविण्याचे कंत्राट घेतलेल्या फ्लाय बिग कंपनीने देखभाल दुरुस्तीच्या नावावर करार संपण्यापूर्वीच आपला गाशा गुंडाळला. त्यामुळे या विमानतळावरून सुरू झालेली प्रवासी विमान वाहतूक सेवा ही औट घटकेची ठरली.
गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे तत्कालीन केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारले होते. तसेच या ठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र सुरूसुद्धा करण्यात आले.
या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याची बाब मागील चार-पाच वर्षांपासून विचाराधीन होती. त्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाच्या उड्डाण प्रकल्पांतर्गत विमान सेवा सुरू करण्यासाठी खा. सुनील मेंढे यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यशसुद्धा आले. नोएडा येथील फ्लाय बिग या खासगी विमान कंपनीने बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा करण्याचे कंत्राट घेतले. १३ मार्चपासून २०२२ या विमानसेवेला प्रारंभ करण्यात आला. गोंदिया-इंदोर-हैदराबाद या विमानसेवेला सुरुवात करण्यात आली. त्याला प्रवाशांचासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत होता.
प्लाय बिग कंपनीने ऑक्टोबरपर्यंत या विमानतळावरून विमान सेवा सुरू ठेवण्याचा करार केला. पण पाच महिन्यांच्या कालावधीतच ९ ऑगस्टपासून देखभाल दुरुस्तीच्या नावावर प्रवासी विमान वाहतूक सेवा बंद केली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील प्रवाशांसाठी ही सेवा औट घटकेची ठरली.
प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज
- बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. या विमानतळावरून प्रवासी व कार्गो सेवा सुरू करण्याला वाव आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्य लागून आहे. शिवाय गोंदिया हे हावडा-मुंबई मार्गावरील एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेला चांगला वाव होता. पुन्हा ही सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि केंद्रात वजनाची गरज आहे.
सेवा बंद करण्यासाठी देखभाल दुरुस्तीचा बहाणा
- फ्लाय बिग कंपनीने ९ ते २१ ऑगस्ट दरम्यान विमानांच्या देखभाल दुरुस्तीचे कारण देऊन पुढे सेवा बंद राहणार असल्याचे सांगितले. मात्र २१ ऑगस्टनंतरही फ्लाय बिगने विमानसेवा सुरू केली नाही. विशेष म्हणजे विमानतळावरील त्यांच्या कार्यालयाचे साहित्यसुद्धा घेऊन गेले.
विमानतळ प्राधिकरणाचे २ लाख रुपये शिल्लक
- प्लाय बिग कंपनी विमानतळाच्या रनवेपर्यंत सामान पोहोचविण्यासाठी मार्च महिन्यापासून एक ट्रॅक्टर भाड्याने घेतले होते. या ट्रॅक्टरचा किराया जवळपास २ लाख रुपये शिल्लक असून तो अद्यापही फ्लाय बिग कंपनीने बिरसी विमानतळ प्राधिकरणाने जमा केला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची आशा धूसर
- बिरसी विमानतळावर नाइट लँडिंगसाठी आवश्यक असलेली एएलएस (ऑटोमॅटिक लँडिंग सिस्टीम) ही कंपनीने काढून नेली आहे. त्यामुळे बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता आता फार कमी असल्याचे बोलले जाते.