कोविड काळातही बिरसीवासीयांचे आंदोलन सुरूच ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:30 AM2021-05-07T04:30:21+5:302021-05-07T04:30:21+5:30
गोंदिया : मागील चार महिन्यांपासून सुरू असलेले बिरसीवासीयांचे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. सध्या कोविड काळ सुरू असूनही जिल्हा ...
गोंदिया : मागील चार महिन्यांपासून सुरू असलेले बिरसीवासीयांचे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. सध्या कोविड काळ सुरू असूनही जिल्हा व विमानतळ प्रशासनाने या आंदोलनाची अजूनही दखल घेतली नाही. त्यामुळे बिरसी येथील नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त आहे.
आपल्याला पुन्हा विमानतळ प्रशासनात कामावर घेण्यात यावे, या मागणीसाठी येथील एकूण बावीस सुरक्षारक्षक आपल्या कुटुंबासह जानेवारी महिन्यापासून विमानतळ गेटसमोर आंदोलन सुरू केले आहे. त्यातच आपले त्वरित पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी १०६ प्रकल्पग्रस्त कुटुंबही आंदोलनाला बसले आहेत. तसेच येथील अतिक्रमण ठरवून बेघर करण्यात आलेल्या एकूण ४० कुटुंबांनी स्थानिक ग्रामपंचायतीसमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे. या तीनही आंदोलनाला जवळपास चार महिन्यांचा काळ लोटला आहे. तरीही जिल्हा व विमानतळ प्रशासनाने एकही आंदोलनकर्त्यांच्या मागणीची पूर्तता केली नाही. ही तिन्ही आंदोलने विमानतळ प्रशासनाशी निगडित असूनही विमानतळ प्रशासनाने या आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव बिरसी येथील नागरिकांना हे आंदोलन सुरू ठेवावे लागले आहे. सध्या सर्वत्र कोरोना या महामारीने थैमान घातले असून अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. या आंदोलनाला जिल्ह्यातील अनेक सामाजिक व राजकीय संघटना तसेच आमदार, खासदार यांनी भेटी देऊनही अजूनपर्यंत त्यांचा प्रश्न मार्गी न लावल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये रोष व्यक्त आहे.
कोरोना काळात तरी जिल्हा व विमानतळ प्रशासनाने या तिन्ही आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे.