सामान्य प्रसूतितून जुळ्या बाळांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 06:00 AM2019-12-21T06:00:00+5:302019-12-21T06:00:26+5:30
बाल व माता मृत्यूवर आळा घालण्यासाठी कोणतीही प्रसूती आरोग्य संस्थेत करावी असा आग्रह आरोग्य विभागाकडून धरला जातो. सामान्य प्रसूती उपकेंद्र, आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालयात केले जाते. परंतु अडचणीची किंवा गुंतागुंतीची प्रसूती असल्यास त्या बाळंतिनींना मोठ्या रूग्णालयातच पाठवून प्रसूती तज्ज्ञांच्या माध्यमातूनच प्रसूती केली जाते.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाल व माता मृत्यूवर आळा घालण्यासाठी संपूर्ण आरोग्य विभाग नेहमीच प्रयत्न करतो. परंतु रूग्णांना किंवा गर्भवतींना उत्तम आरोग्य सेवा देण्यात जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अग्रेसर आहे. प्रसूती गुंतागुंत किंवा शक्य नसलेली प्रसूती बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सहजरित्या करण्यात आली. परिणामी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.
बाल व माता मृत्यूवर आळा घालण्यासाठी कोणतीही प्रसूती आरोग्य संस्थेत करावी असा आग्रह आरोग्य विभागाकडून धरला जातो. सामान्य प्रसूती उपकेंद्र, आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालयात केले जाते. परंतु अडचणीची किंवा गुंतागुंतीची प्रसूती असल्यास त्या बाळंतिनींना मोठ्या रूग्णालयातच पाठवून प्रसूती तज्ज्ञांच्या माध्यमातूनच प्रसूती केली जाते.
रूग्णांना किंवा गर्भवतींना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी आमगाव तालुक्याच्या बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र सुरूवातीपासून प्रसिध्द आहे. याचीच पावती म्हणून या प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्याचा आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे महत्त्व राखीत हे प्राथमिक आरोग्य आमगाव शहरात असून ग्रामीण रूग्णालयाच्या तुलनेत अधिक पटीने दर्जेदार सेवा प्रदान करीत आहे. आमगाव पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत भास्कर जमदाळ या कर्मचाºयाची पत्नी निलीमा गर्भवती होत्या. डॉक्टरांनी त्यांच्या प्रसूतीची संभाव्य तारीख १ जानेवारी २०२० दिली होती. प्रसूतीचा वेळ जवळ आल्यावर भास्कर जमदाळ सुट्टी घेणार होते. परंतु पती नोकरीवर असतांना निलिमा जमदाळ यांना १८ डिसेंबरच्या सकाळी ५ वाजतापासून प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. काही वेळाने निलिमा यांनी आपल्या पतीला फोनवर सूचना केल्याने पोलीस कर्मचारी जमदाळ यांनी घर गाठून सकाळी ७ वाजता पर्यंत त्यांना बनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. पोटात जुळे बाळ आहेत हे आधीचेच माहित होते. परंतु प्रसूतीची संभाव्य तारीख पुढे असल्याने जमदाळ कुटुंबिय निवांत होते.
१८ तारखेला पहाटेच प्रसूतीच्या वेदनात भर पडल्याने त्यांना बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर अवघ्या अर्ध्या तासाच प्रसूती नक्की होईल असा अंदाज डॉक्टरांना आला. एवढ्या कमी वेळात त्या गर्भवतीला आमगाववरून गोंदियाला पाठविणे शक्य नव्हते. पोटात जुळे बाळ असल्याने बनगाव येथील डॉक्टरांना त्या गर्भवतीची प्रसूती करणे धोक्याचे वाटत होते. परंतु वेळेअभावी प्रसूती करणे गरजेचे असल्यामुळे डॉक्टरांनी यासंदर्भात निलिमाच्या पतीला समजावून सांगितले. आणि प्रसूतीला सुरूवात केली.डॉक्टरांच्या कर्तव्य दक्षपणामुळे निलिमा जमदाळ यांनी दोन बालकांना जन्म दिला.वैद्यकीय अधिकारी डॉ. ताम्रध्वज नागपुरे, डॉ बृजबाला बोपचे यांनी सदर प्रसूती यशस्वीरित्या केली.या डॉक्टरांच्या मदतीला दोन अनुभवी अधिपरिचारीका छाया सूर्यवंशी, लता टेंभूर्णीकर होत्या. या चारही जणांच्या प्रयत्नाने निलिमाची सामान्य प्रसूती झाली.
दोन्ही बाळ सुदृढ
निलिमा भास्कर जमदाळ यांनी जन्म दिलेले दोन्ही बाळ सुदृढ आहेत. सकाळी ९.११ वाजता जन्मलेला पहिला बाळ ३ किलो १०० ग्रॅम वजनाचा तर सकाळी ९.१७ वाजता जन्मलेला दुसरा बाळ २ किलो ७०० ग्रॅम वजनाचा आहे. सामान्य प्रसूतीतून जुळे बाळ जन्माला येतात आणि तिही सामान्य प्रसूती एका प्राथमिक आरोग्य केंद्रात होणे ही बाब अत्यंत प्रशंसनिय आहे. सोबतच बाळ पोटात असतांना त्यांना शस्त्रक्रिया करूनच प्रसूती होईल अशी धास्ती दाखविणाºया खासगी डॉक्टरांना चांगलीच चपराक आहे.
ग्रामीण रूग्णालय फक्त नावापुरते
आमगावला तालुका म्हणून ग्रामीण रूग्णालय आहे.परंतु हे ग्रामीण रूग्णालय स्वत:च आजारी आहे. आमगाव असलेले बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रूग्णालयासारखी सेवा देते. परंतु ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी आरोग्य सेवा मिळत नाही. हे ग्रामीण रूग्णालय फक्त नावापुरते आहे. प्रसूतीसाठी आलेल्या रूग्णांनाही रेफर केले जाते.
दोन बाळ पोटात असल्यामुळे ती प्रसूती बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात प्रसूती तज्ज्ञांच्याच हातून होणे अपेक्षीत होते. परंतु अर्ध्या तासात प्रसूती होईल. गोंदियाला जातांना रसत्यातच प्रसूती होईल असे वाटत असल्याने मातेच्या किंवा बाळाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून ही प्रसूती करण्यात आली.
-डॉ. ताम्रध्वज नागपुरे
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव.