आमगावातील स्मशानात हाेतो ‘बर्थ डे’ साजरा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:29 AM2021-01-20T04:29:34+5:302021-01-20T04:29:34+5:30
नरेश रहिले गोंदिया : नकारात्मक विचार उत्पन्न होणारे ठिकाण म्हणजे स्मशान घाट; परंतु स्मशानघाटावर अंत्यसंस्कार होतोच; पण वाढदिवसही ...
नरेश रहिले
गोंदिया : नकारात्मक विचार उत्पन्न होणारे ठिकाण म्हणजे स्मशान घाट; परंतु स्मशानघाटावर अंत्यसंस्कार होतोच; पण वाढदिवसही साजरा होतो, असे म्हटले तर कुणी विश्वास ठेवणार नाही. मात्र, ही सत्य गोष्ट आहे. आमगावच्या किडंगीपार नाल्यावर असलेल्या स्मशानघाटावर अंत्यसंस्काराचेही काम केले जाते तसेच त्याच परिसरात वाढदिवसही साजरा केला जातो.
स्मशानघाटाकडे अपवित्र भावनेने काही लोक पाहतात; परंतु या स्मशान घाटाला (मोक्षधाम) म्हणून संबोधले जाते. हा मोक्षाकडे जाण्याचा मार्ग अपवित्र नाही तर मोक्षाची प्राप्ती मिळविण्यासाठी ज्या घाटावर संत्यसंस्कार केले जाते ते घाट तीर्थस्थळ व्हावे यासाठी आमगाव येथील विविध घटकांतील लोकांनी एकत्र येऊन शिव मोक्षधाम सेवा समिती रिसामा/आमगाव या नावाने तयार केली. या स्मशानघाटावर जणू तीर्थस्थळ उभारण्यात आले आहे. गोंदिया रोडवरील किडंगीपार नाल्यावर असलेल्या स्मशानघाटाचा कायापालट केला. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर रेल्वे पुलाच्या खाली असलेल्या हा स्मशानघाट चार वर्षांपूर्वी दुरवस्थेत होता. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते; परंतु मार्च २०१७ मध्ये एकत्र आलेल्या आमगाव व रिसामा येथील नागरिकांनी शिव मोक्षधाम सेवा समिती स्थापन केली. मागील चार वर्षांपासून या स्मशानघाटावर दर रविवारी २० ते २५ लोक सकाळी ७ वाजता गोळा होतात. दर रविवारी सकाळी ७ ते ९ वाजता दोन तास श्रमदान करून मोक्षधामाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करतात. या समितीतील प्रत्येक सदस्य महिन्याकाठी शंभर रुपये गोळा करून त्या स्मशानघाटावर आवश्यक असणाऱ्या बाबींची ते पूर्तता करतात. इतकेच नव्हे तर आमगावातील नामवंत व्यक्तीही या समितीसोबत जोडलेल्या आहेत. प्रत्येक सदस्याचा वाढिदवस असेल त्या आठवड्याच्या रविवारी केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला जातो. आमगाव येथील प्रतिष्ठित नागरिक प्रमोद कटकवार यांचा वाढदिवस नुकताच साजरा केला. समितीचे अध्यक्ष रवी क्षीरसागर, उपाध्यक्ष संजय बहेकार, सचिव महेश उके, विजय मेश्राम, संपर्क प्रमुख राजेश मेश्राम, राजेश सातनुरकर, नारायण मेश्राम, राजू आंबेडारे, संजय ढगे, प्रमोद कटकवार, संतोष कटकवार, मुन्ना शेंडे, मनोज शाहू, आशिष दुबे, भरतलाल राणे, राजेश देशमुख, सुरेश बावनथडे, नीलकंठ बारसागडे, प्रवीण येवले, भोला गुप्ता, अशोक मुनेश्वर, मोरेश्वर गायधने, सचिन मेश्राम, रमेश चव्हाण, राजू वंजारी व शेंडे हे मोक्षधाम परिसराची स्वच्छता राखण्यासाठी श्रमदान करतात.
बॉक्स
लोकवर्गणीतून १० लाख खर्च
या स्मशानघाटावर स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार करण्यात आले. शिवमंदिर उभारण्यात आले. स्मशानघाटावर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी येथील सदस्यांनी चार वर्षांत १० लाख रुपये खर्च करून त्याचा कायापालट केला. या परिसरात पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी मैदान तयार करण्याची प्रक्रिया जोमाने सुरू आहे.