दुचाकींवर चोरट्यांची वक्रदृष्टी

By admin | Published: October 8, 2015 01:23 AM2015-10-08T01:23:10+5:302015-10-08T01:23:10+5:30

जिल्ह्यात दुचाकी वाहने पळविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या ९ महिन्यात महिन्याकाठी सरासरी सहा दुचाकी पळविण्यात आल्या आहेत.

Bizarre | दुचाकींवर चोरट्यांची वक्रदृष्टी

दुचाकींवर चोरट्यांची वक्रदृष्टी

Next

गोंदिया : जिल्ह्यात दुचाकी वाहने पळविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या ९ महिन्यात महिन्याकाठी सरासरी सहा दुचाकी पळविण्यात आल्या आहेत. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान ५४ दुचाकी वाहने पळविण्यात चोरट्यांना यश आले आहे. परंतु त्यांना पकडण्यात जिल्हा पोलीस अपयशी ठरले आहेत.
चालू वर्षात जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांतून घेतलेल्या माहितीनुसार नऊ महिन्यात ५४ दुचाकी वाहने पळविण्यात आले आहेत. आरोपींनी गर्दीच्या ठिकाणी असलेल्या अस्ताव्यस्त वाहनांवर वक्रदृष्टी टाकून त्या गाडी मालकाची नजर चुकवत दुचाकी पळविण्याचा सपाटा सुरू केला आहे. परंतु त्या दुचाकीचोरांना शोधून काढण्यात पोलिसांना अद्याप तरी यश आलेले नाही. चोरलेल्या
दुचाकीचा क्रमांक काढून ते वाहन राजरोसपणे शहरात किंवा जिल्ह्यात चालविल्या जातात. चोरलेल्या वाहनांवर बोगस क्रमांक लावून ते वाहन वापरण्यात येत आहे. गोंदिया शहरातून सर्वात जास्त वाहने चोरीला जातात. बेशिस्त असलेल्या पार्र्कींगचा फायदा घेत ते वाहन चोरण्यास चोरट्यांना सहज शक्य होते. गोंदियातील बेशिस्त पार्कीेंगमुळे वाहन चोरट्यांना वाहन पळविने सहज शक्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)

शहरात सार्वजनिक ठिकाणी कॅमेऱ्यांची गरज
गोंदियासारख्या व्यापारी शहरात चोरी, लुटमारीसारख्या घटना कधीही घडू शकतात. हे कोलकाता मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. तीन राज्यांची सीमा लागून असलेल्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. याशिवाय हा नक्षलगस्त जिल्हा आहे. तरीही या ठिकाणी प्रमुख सार्वजनिक स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
हँडल लॉक वाहनेही पळविली
हँडल लॉक केलेली वाहने दिवसाढवळ्या पळविण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. जुन्या मास्टर किल्लीने हँडल उघडले जाते. काही काही दुचाकी वाहनांचे हँडल झटका मारल्यावर तुटत असल्याने ते लॉक तोडून वाहने पळविली जातात.
१५ दुचाकी जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन महिन्यापूर्वी गोरेगाव तालुक्याच्या कलपाथरी येथील एका व्यक्तीकडून १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या. परंतु जप्त करण्यात आलेल्या दुचाकीपैकी बहुतांश दुचाकी राजनांदगाव व नागपूरच्या आहेत. या १५ पैकी फक्त दोनच दुचाकी वाहने गोंदिया जिल्ह्यातील असल्याचे आढळले आहेत.
गर्दीचे ठिकाण चोरट्यांचे ‘लक्ष्य’
दुचाकी चोर गर्दीचा फायदा घेत वाहन चोरी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोंदिया शहरातून चोरीला गेलेल्या दुचाकी सर्वात जास्त गर्दीच्या ठिकाणावरून पळविण्यात आल्या आहेत. रेल्वेस्थानक, बँक परिसर, रूग्णालय, बसस्थानक व बाजार परिसरात अशा सार्वजनिक ठिकाणावरून या दुचाकी पळविल्या आहेत. गर्दीचा फायदा घेत वाहनाला पळवून नेण्यात चोरटे यशस्वी होतात. मात्र शहरात अशा सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही लावणे आवश्यक असताना अजूनही पोलिसांना जाग आलेली नाही.
वाहनधारकांनी हे करावे
वाहन चालकांनी नेहमी आपल्या सोबत वाहनाचे कागदपत्र ठेवावे. परंतु ते कागदपत्र वाहनाच्या डिक्कीत न ठेवता स्वत:कडे ठेवावे. वाहनाच्या डिक्कीत कागदपत्र ठेवले व ते वाहन चोरीला गेल्यास त्या वाहनाला विकणे आरोपीला सोपे जाते. चोरीची वाहने विकली जात असताना पोलिसांना ओळखता येत नाही. त्यासाठी प्रत्येक वाहन चालकाने आरसी बुकची झेरॉक्स तरी आपल्याकडे ठेवणे आवश्यक आहे. त्यातून वाहन चोरीवर आळा घालण्यास मदत होईल. रात्रीच्या वेळी आपल्या घरी वाहन ठेवताना त्या वाहनांना लोखंडी साखळीने बांधून ठेवावे.
५ रूपयासाठी ५० हजारांचे नुकसान
रेल्वे स्थानकाच्या बाहेर शेकडो गाड्या बेवारस पडलेल्या असतात. स्थानकावर मोटारसायकल ठेवण्यासाठी स्टँड आहे. मात्र ५ रूपये भाडे वाचविण्यासाठी लोक गाडीच्या सुरक्षेशी तडजोड करतात आणि कुठेही वाहन ठेवतात. हे ५ रुपये वाचविण्याच्या नादात त्यांचे वाहन चोरी गेल्यास ५० हजार रूपयांचे नुकसान होते.

Web Title: Bizarre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.