भाजप आणि कॉँग्रेस आमने- सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:43 PM2018-03-23T22:43:05+5:302018-03-23T22:43:05+5:30

नगर परिषदेने बैठकी बाजार वसुलीसाठी काढलेल्या निविदेला घेऊन आता विरोधी पक्षातील कॉँग्रेसचे सदस्य चांगलेच खवळले असून त्यांनी निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.

BJP and Congress face-to-face | भाजप आणि कॉँग्रेस आमने- सामने

भाजप आणि कॉँग्रेस आमने- सामने

Next
ठळक मुद्देबाजार वसुली निविदा प्रकरण : बाजार वसुली निविदा रद्द करण्याची कॉँग्रेसची मागणी

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : नगर परिषदेने बैठकी बाजार वसुलीसाठी काढलेल्या निविदेला घेऊन आता विरोधी पक्षातील कॉँग्रेसचे सदस्य चांगलेच खवळले असून त्यांनी निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. यासाठी कॉँग्रेसच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी व आमदारांना निवेदन दिले आहे. एकंदर यानंतर नगर परिषदेत भारतीय जनता पक्ष व कॉँग्रेस पक्ष आमने-सामने आल्याचे दिसून येत आहे. अशात आता हे प्रकरण काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ कलम २७२ अंतर्गत बैठकी बाजार वसुली केली जात होती. मात्र नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या त्यांच्या पदग्रहण समारंभात बैठकी बाजार वसुली बंद करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेमुळे बाजारात दुकान लावणाऱ्यांकडून वसुलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैसे दिले जात नव्हते. अशात मात्र नगर परिषदेला बैठकी बाजारातून येत असलेल्या सुमारे सात लाख रूपयांच्या उत्पन्नावर पाणी फेरले गेले. अचानक हे उत्पन्न बंद झाल्याने नगर परिषदेची आर्थिक अडचण वाढली. विशेष म्हणजे, बाजार वसुली बंद करताना तेवढ्याच उत्पन्नाची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी असे अधिनियमात नमूद आहे.
मात्र नगराध्यक्षांच्या या निर्णयाने बाजार वसुली बंद झाली व पर्यायी व्यवस्था काहीच करण्यात आली नव्हती. यावर बाजार विभागाने पर्यायी व्यवस्था करण्यासाठी स्टेडियम चौपाटी व खोजा मस्जीद फुटपाथ वरील दुकानदारांकडून मासीक एक हजार रूपयांची वसुली सुरू केली. मात्र या दुकानदारांक डूनही प्रतिसाद मिळत नव्हता. परिणामी बैठकी बाजार वसुलीसाठी नगर परिषदेने निविदा काढून लिलाव करण्याचे ठरविले. त्यानुसार, बाजार विभागाने १० मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध करून निविदा मागविली.
हा प्रकार मात्र नगर परिषदेत विरोधी पक्षात असलेल्या क ॉँग्रेस पक्षातील सदस्यांना पटला नाही. यामुळे त्यांनी नगर परिषदेने बैठकी बाजार वसुलीसाठी काढलेली निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीसाठी कॉँग्रेसच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील व आमदार गोपालदास अग्रवाल यांना निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे,
या निवेदनातून कॉँग्रेस सदस्यांनी निविदा त्वरीत रद्द न केल्यास कॉँग्रेस पक्ष तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला आहे. क ॉँग्रेस पक्षाच्या या भूमिकेमुळे नगर परिषदेत आता भाजप व कॉँग्रेस आमने-सामने आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण काय वळण घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
स्वत:च्या चुकीवर पडदा घालण्याचा प्रकार
काँग्रेस पक्षाने दिलेल्या निवेदनानुसार, नगराध्यक्षांनी केलेल्या घोषणेमुळे हा सर्व प्रकार घडला आहे. नियमांना बाजूला सारून त्यांनी ही घोषणा केली असून याबाबत कोणत्याही सभेत ठराव घेण्यात आलेला नाही. तर यांतरही नियमांना पुन्हा बाजूला सारून प्रस्ताव न ठेवता आपल्या चुकीवर पडदा घालण्याचा प्रकार केला जात आहे. शिवाय शहरातील जनता शांतीप्रीय असून बाजार वसुली कंत्राटी तत्वावर दिल्यास शहरातील शांती भंग होण्याची चिन्हे आहेत. कंत्राटदार आपल्या मर्जीने वसुली करणार व त्यावर नगर परिषदेचे अंकुश राहणार नसल्याचेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे बैठकी बाजार वसुलीची निविदा त्वरीत रद्द करण्याची मागणी नगर परिषद विरोधी पक्ष नेता व बांधकाम समिती सभापती शकील मंसुरी, माजी सभापती राकेश ठाकूर, नगर परिषद सदस्य क्रांती जायस्वाल, सुनील भालेराव, सुनील तिवारी, भागवत मेश्राम, दिपीका सुरे, श्वेता पुरोहीत, शिलू ठाकूर, निर्मला मिश्रा व पराग अग्रवाल यांनी केली आहे.

Web Title: BJP and Congress face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.