भाजपने केले विनोद अग्रवाल यांचे निलंबन रद्द, घर वापसी होणार
By अंकुश गुंडावार | Published: October 6, 2024 05:44 PM2024-10-06T17:44:39+5:302024-10-06T17:45:28+5:30
सोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांचेही निलंबन रद्द
गोंदिया: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान विनोद अग्रवाल यांना डावलून भाजपने माजी आ. गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे विनोद यांनी भाजपला रामराम ठोकत अपक्ष निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता. भाजपने त्यांच्यासह इतर १२ जणांवर बंडखोरीचा ठपका ठेवीत पक्षातून निलंबित केले होते. पण हे निलंबन तब्बल पाच वर्षांनंतर रविवारी (दि. ६) रद्द केले. त्यामुळे त्यांच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी (दि.६) पत्र काढून आ. विनोद अग्रवाल यांच्यासह एकूण १२ जणांचे निलंबन मागे घेण्यात येत असल्याचे पत्र काढले आहे. माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये २० दिवसांपूर्वी घरवापसी केली. त्यानंतरच आ. विनाेद अग्रवाल यांना भाजपमध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. तर आ. अग्रवाल यांच्या भाजप नेत्यांसह गाठीभेटी वाढल्या होत्या. तर त्यांनी चावी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची दोनदा सभा घेऊन भाजपमध्ये परतावे की याबाबत कल जाणून घेतला होता. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये घरवापसी करतील अशी चर्चा होती. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विनाेद अग्रवाल यांचे निलंबन मागे घेतल्याचे पत्र काढल्याने घरवापसीच्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. येत्या दोन तीन दिवसांत त्यांची अधिकृतपणे घरवापसी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उमेदवारी विनोद अग्रवाल यांनाच
भाजपने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात तीन संस्थेच्या माध्यमातून तीन ते चार सर्वे केले त्यात आ. विनोद अग्रवाल यांचे नाव पुढे आल्याची माहिती आहे. त्यामुळेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर सखोल चर्चा करून गोंदिया विधानसभेतून आ. विनाेद अग्रवाल यांनाच भाजपकडून रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलल्या जाते. यासाठीच त्यांचे निलंबन रद्द करून एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा आहे.
यांचेही निलंबन केले रद्द
आ. विनोद अग्रवाल यांच्यासह तत्कालीन भाजप जिल्हा सरचिटणीस भाऊराव उके, मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, अमित बुद्धे, मुनेश रहांगडाले, रामराजे रवरे, शिव शर्मा, घनश्याम पानतवने, धर्मपाल अग्रवाल, दीपक बोबडे, नीतू बिरीया, शैलेश सोनवाने, कमलेश लिल्हारे आदी पदाधिकारी गेले होते. यासर्वांवर पक्षांने निलंबनाची कारवाई केली होती. यासर्वांचे निलंबनसुद्धा रद्द करण्यात असल्याचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले आहे.