भाजप दलित विरोधी
By admin | Published: May 24, 2016 02:01 AM2016-05-24T02:01:32+5:302016-05-24T02:01:32+5:30
आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्या शिव शर्मा यांना पक्षातून निष्कासीत केल्यानंतरही भारतीय जनता पक्ष त्यांना समर्थन करीत आहे.
भ्रष्टाचाऱ्यांना देते समर्थन : राकेश ठाकूर यांचा आरोप
गोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्या शिव शर्मा यांना पक्षातून निष्कासीत केल्यानंतरही भारतीय जनता पक्ष त्यांना समर्थन करीत आहे. दुसरीकडे दलित समाजातील भाजपच्या दोन निष्ठावान कार्यकर्त्यांना गुन्ह्यात अडकविल्यावरही भाजप त्यांच्या मदतीला पुढे आलेली नाही. यातून भाजपची दुटप्पी भूमिका व भाजप दलितविरोधी असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी सभापती राकेश ठाकूर यांनी पत्रकातून केला आहे.
आमदार अग्रवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्या शर्मा यांना भाजपातून निष्कसीत करण्यात आले आहे. असे असतानाही शर्मावर लागलेली ३०७ कलम हटविण्यासाठी भाजपकडून अधिकारी व राजनेत्यांना निवेदन दिले जात आहे. दुसरीकडे पंकज यादव यांच्यावर हल्ला झाला त्या प्रकरणात पोलिसांनी अभिमन्यू चतरे व अजय बिरीया या दोघांवर गुन्हा नोंदविला आहे. चतरे बजरंग दलचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत तर बिरीया भाजपचे निष्ठावान कार्यकर्ता आहे. हे दोघे दलीत समाजातील व गरीब आहेत त्यामुळे भाजप त्यांच्या मदतीला धावली नाही. शर्मा पैसेवाला असून भ्रष्टाचार करून पक्षाला पैसे देत असल्याने भाजप त्याच्या मागे उभी आहे.
खासदार नाना पटोले यांनी भ्रष्टाचार व अपराध संपवायचे असल्याबाबत बोलत आहेत. तर दुसरीकडे शर्मा सारख्या भ्रष्टाचारींना समर्थन देऊन प्रोत्साहन देत आहेत. शिवाय हेच खासदार पटोले असामाजीक तत्वांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट करवून त्यांना राजकीय संरक्षण देत आहेत. याशिवाय कॉंग्रेस भ्रष्टाचारी असल्याचे बोलत असून कॉंग्रेससोबत जिल्हा परिषदेत हातात हात टाकून बसले आहेत.
३० दिवसांत या युतीचा निर्णय घेणार असल्याचे खासदार नाना पटोले बोलत होते. मात्र ३० दिवस लोटून गेल्यावरही युतीवर भाजपने काहीच निर्णय घेतला नाही. यातून हे सत्तासुख भोगण्यासाठी कॉंग्रेससोबत असल्याचे स्पष्ट होते. आपल्या स्वार्थासाठी ते राजकारण करीत असून ते आपली पोळी शेकत असल्याचा आरोप ठाकूर यांनी पत्रकातून केला आहे. (शहर प्रतिनिधी)