भाजप सरकारने जनहितार्थ योजना बंद केल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:40 PM2019-04-02T23:40:42+5:302019-04-02T23:41:06+5:30
विकास आणि जनहितार्थ योजना राबविण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने प्रत्यक्षात याविरुध्द काम केले आहे. गोरगरीब व सर्वसामान्यांच्या हितार्थ राबविल्या जात असलेल्या जनहितार्थ योजना भाजप सरकारने बंद जनतेचा विश्वासघात केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विकास आणि जनहितार्थ योजना राबविण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने प्रत्यक्षात याविरुध्द काम केले आहे. गोरगरीब व सर्वसामान्यांच्या हितार्थ राबविल्या जात असलेल्या जनहितार्थ योजना भाजप सरकारने बंद जनतेचा विश्वासघात केला. गोसेखुर्दसारख्या महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्पाचा निधी रोखून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केल्याची टिका खा.प्रफुल्ल पटेल यांनी केली.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी (दि.२) गोरेगाव तालुक्यातील कालीमाटी, हिराटोला, चोपा, मुंडीपार, बोटे, कुºहाडी व कवलेवाडा येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
या वेळी उमेदवार नाना पंचबुध्दे, माजी आ.दिलीप बन्सोड, के.आर.शेंडे, पी.जी.कटरे, झामसिंग बघेले, मनोहर चंद्रिकापुरे, जगदीश येरोला, ज्योती वालदे, कैलाश डोंगरे, राजू भेलावे, ललिता बहेकार, डेमेंद्र रहांगडाले, केवल रहांगडाले, लक्ष्मण चंद्रिकापुरे उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल म्हणाले, भाजप सरकारने अनेक महत्त्वपूर्ण योजना बंद करुन विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचे काम केले. मागील दोन वर्षांपासून मनरेगाच्या मजुरांना वेतन मिळाले नाही, इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मानधन व ओबीसी विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. तर नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण समजली जाणारी बीआरजीएफ योजना , राष्ट्रीय आरोग्य अभियानासारख्या योजनेत कपात करुन त्या योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र अद्यापही या योजनेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे ही योजना सुध्दा जुमलेबाज निघाली. तर धानाला लागवड खर्चावर आधारित हमीभाव देण्याची घोषणा केली होती पण याची सुध्दा पुर्तता सरकारने केली नाही.
निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मागील चार वर्षांत यंदा प्रथमच धानाला ५०० रुपये बोनस जाहीर केले. मात्र याचा सुध्दा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळाला नाही. जीएसटी कर प्रणाली लागू करुन लहान उद्योग बंद पाडून रोजगार हिरावण्याचे काम केले. तर पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरची दरवाढ करुन सर्वसामान्यांना जीणे मुशीकल केले आहे. त्यामुळे अशा विश्वासघाती आणि जनतेच्या अपेक्षा भंग करणाऱ्या सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले. तसेच गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्यास सांगितले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा सभेला संबोधित केले.