गोंदिया नगर परिषदेत ‘भाजपराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2017 12:54 AM2017-02-18T00:54:08+5:302017-02-18T00:54:08+5:30

नगर परिषदेतील विषय समित्यांचे सभापतिपद काबीज करीत भारतीय जनता पक्षाने पालिकेवर आपली सत्ता स्थापित केली.

'BJP Raj' at Gondiya Nagar Parishad | गोंदिया नगर परिषदेत ‘भाजपराज’

गोंदिया नगर परिषदेत ‘भाजपराज’

googlenewsNext

नवख्यांनाही दिली संधी : सभापतिपदी पानतावणे, कदम, गोपलानी, बिसेन व मेश्राम
गोंदिया : नगर परिषदेतील विषय समित्यांचे सभापतिपद काबीज करीत भारतीय जनता पक्षाने पालिकेवर आपली सत्ता स्थापित केली. विषय समित्यांचे सर्व सभापतिपद भाजपने आपल्याकडे घेतले. सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या बांधकाम समिती सभापतिपदी गटनेता घनश्याम पानतावणे यांची वर्णी लागली. या निवडणुकीत जुन्यांसह नवख्यांनाही संधी देण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने तटस्थ भूमिका निभावल्याचे दिसून आले.
विषय समित्यांचे गठन, उपाध्यक्षांकडे कोणती समिती द्यावी व विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यासाठी शुक्रवारी (दि.१७) पालिकेने विशेष सभा बोलाविली होती. या सभेत सर्वप्रथम विषय समित्यांमध्ये किती सदस्य असावेत यावर चर्चा करण्यात आली. यावर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसने समितीत ११ सदस्य घेण्यावर सहमती दर्शविली. गोंदिया शहर परिवर्तन आघाडी व कॉंगे्रसच्या सदस्यांनी १२ सदस्य घेण्याची मागणी केली. त्यावर ११ सदस्यांना घेऊन २५ सदस्य व नगराध्यक्ष अशा २६ जणांनी आणि १२ सदस्यांवर १६ जणांनी हात उचावले. त्यानुसार विषय समित्यांत ११ सदस्य ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विषय समितीत भारतीय जनता पक्षाचे पाच, कॉंग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे दोन व गोंदिया शहर परिवर्तन आघाडीचे दोन अशा एकूण ११ सदस्यांची निवड करण्यात आली.
त्यानंतर उपाध्यक्षांकडे कोणती समिती देण्यात यावी यावर चर्चा करण्यात आली. यात उपाध्यक्षांना स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती देण्यात यावी असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर विषय समित्यांचे गठन करीत सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर तर सहकारी मुख्याधिकारी चंदन पाटील उपस्थित होते. लिपीक शिव हुकरे, मुकेश शर्मा, एस.एस.गायधने आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

तिरोडा न.प. सभापतीची निवड एकमताने
१७ फेबु्रवारी रोजी शुक्रवारला नगर परिषद सभापतीची निवड झाली. यात बांधकाम सभापतीपदी अशोक असाटी (भाजप), शिक्षण सभापतीपदी नरेश कुंभारे (राष्ट्रवादी), महिला व बालकल्याण सभापतीपदी श्वेता मानकर (भाजप) तर आरोग्य व स्वच्छता समिती उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर (शिवसेना) यांच्याकडे आली. सर्वानुमते ही निवड करण्यात आली हे विशेष. पिठासीन अधिकारी म्हणून सुनील सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, तथा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे व न.प.सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: 'BJP Raj' at Gondiya Nagar Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.