काळजी नको जि.प.मध्ये भाजपचीच सत्ता; प्रदेशाध्यक्षांनी दिला कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 06:17 PM2022-02-04T18:17:38+5:302022-02-04T18:27:24+5:30

शुक्रवारी (दि.४) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेत आपलीच सत्ता स्थापन होईल, काळजी करू नका, असा कानमंत्र सदस्यांना दिल्याची माहिती आहे.

bjp state president chandrakant patil reaction on power establishment over zp gondia | काळजी नको जि.प.मध्ये भाजपचीच सत्ता; प्रदेशाध्यक्षांनी दिला कानमंत्र

काळजी नको जि.प.मध्ये भाजपचीच सत्ता; प्रदेशाध्यक्षांनी दिला कानमंत्र

Next
ठळक मुद्देदोन अपक्षांचे मन वळविण्याचा प्रयत्न

गोंदिया :जिल्हा परिषदेत सर्वाधिक २६ जागा जिंकत भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यावरून मागील आठ दिवसांपासून संभ्रम निर्माण झाल्याने निवडून आलेल्या भाजपच्या जि.प. सदस्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, शुक्रवारी (दि.४) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेत आपलीच सत्ता स्थापन होईल, काळजी करू नका, असा कानमंत्र सदस्यांना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपच्या जि.प. सदस्यांची अस्वस्था काहीशी दूर झाली आहे.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून मागील आठ ते दहा दिवसांपासून सस्पेन्स निर्माण झाला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष सदस्यांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या जि.प. सदस्यांची धाकधूक वाढली आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेचा आजवरचा इतिहास पाहता स्थानिक राजकारणामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता स्थापनेपासून दूर राहावे लागले आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २० जागा जिकंल्या होत्या; परंतु बंगला आणि गल्लीच्या वादात त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते. याच कारणामुळे भाजपच्या सदस्यांचा बीपी मागील आठ दहा दिवसांपासून वाढला होता; पण शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी जि.प. सदस्यांना चिंता करू नका, जिल्हा परिषदेत आपलीच सत्ता स्थापन होणार, असे ठामपणे सांगितले.

भाजप विचारसरणीच्या त्या दोन अपक्ष सदस्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. त्यांनी अनुकूलता दर्शविल्यानेच चंद्रकांत पाटील यांनी सदर वक्तव्य केल्याचे बाेलले जाते. भाजपचा एक ज्येष्ठ नेता बऱ्याच दिवसांनंतर त्यांच्यासोबत मंचावर होता, त्यावरून जि.प. मध्ये सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा भाजप नेत्यांमध्ये होती.

चाबी कुणाचे उघडणार कुलूप

जिल्हा परिषद सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्ष सदस्यांची मदत घ्यावीच लागणार आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आ. विनोद अग्रवाल यांच्या चाबी पक्षाचे चार जि.प. सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. चाबीच्या मदतीने भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचे कुलूप उघडणे सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: bjp state president chandrakant patil reaction on power establishment over zp gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.