चार जागांसाठी भाजपची ‘अग्निपरीक्षा’

By admin | Published: June 21, 2015 01:07 AM2015-06-21T01:07:05+5:302015-06-21T01:07:05+5:30

तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. प्रमुख राजकीय पक्षात उमेदवारीसाठी शक्तीप्रदर्शन सुरू आहे.

BJP's 'Agneeparikshan' for four seats | चार जागांसाठी भाजपची ‘अग्निपरीक्षा’

चार जागांसाठी भाजपची ‘अग्निपरीक्षा’

Next

संतोष बुकावन  अर्जुनी मोरगाव
तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. प्रमुख राजकीय पक्षात उमेदवारीसाठी शक्तीप्रदर्शन सुरू आहे. कुणाला उमेदवारी द्यायची व कुणाकुणाची समजूत घालायची अशा पेचात पक्षश्रेष्ठी अडकले आहेत. इकडे आड आणि तिकडे विहीर असे संकट राजकीय पक्षात निर्माण झाले आहेत. संभाव्य उमेदवार हे पक्ष सोडणे अथवा बंडखोरी करण्याची भिती दाखवत आहेत.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७ जिल्हा परिषद व १४ पंचायत समितीच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीत अद्यापही चार जागांबाबत ‘सस्पेन्स’ आहे. खा.नाना पटोले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मूळच्या भाजपवासीयांनी काही काळापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांना स्वीकारले, मात्र मनातून नव्हे. खा.पटोले हे भाजपमध्ये असले तरी त्यांचे जीवलग कार्यकर्ते दु:खी आहेत. विधानसभा निवडणुकीत या कार्यकर्त्यांनी ना.राजकुमार बडोले यांच्याविरोधात काम केले असा आरोप करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. हाच दल तालुक्यात पटक दल म्हणून ओळखला जातो. तालुका अध्यक्ष रघुनाथ लांजेवार यांना उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेने पं.स.सदस्य किशोर तरोणे यांनी हाताला ‘घड्याळ’ बांधले. त्यांनी १२ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन पक्षाला हादरा दिला.
बोंडगावदेवी व माहुरकुडा जिल्हा परिषद तसेच बोंडगावदेवी व निमगाव पं.स. मध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चुरस आहे. अद्यापही भाजपने उमेदवार घोषित केले नाही. येथे केवळ नावाच्या अफवा सुरू आहेत. ऐनवेळी ए.बी. फार्म येण्याची शक्यता आहे. बोंडगावदेवी येथे कमल प्रमोद पाऊलझगडे व कल्पना लायकराम भेंडारकर यांनी भाजपची उमेदवारी मागितली. पाऊलझगडे या विद्यमान अपक्ष उमेदवार प्रमोद पाऊलझगडे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी पं.स.च्या मागील कार्यकाळात भाजपशी हातमिळवणी केली व यावेळी पत्नीसाठी भाजपकडून उमेदवारी मागीतली. याच गटातून भाजपचे महामंत्री लायकराम भेंडारकर यांनी पत्नी कल्पना यांचेसाठी उमेदवारी मागितली. याच जि.प. गटाच्या निमगाव पं.स. गणातून लायकराम भेंडारकर व जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांनी नामनिर्देश पत्र दाखल केले. कमल पाऊलझगडे यांना बोंडगावदेवी जि.प.ची उमेदवारी जर दिली तर आम्ही पं.स. निमगावची जागा लढणार नाही, असा आक्रमक पवित्रा लायकराम भेंडारकर व अरविंद शिवणकर यांनी घेतला असल्याचे कळते. त्यामुळे येथील रुसवे फुगवे शमविण्याची कसरत पक्षश्रेष्ठींना करावी लागणार आहे.
माहुरकुडा जि.प. गटात उमेदवारीसाठी घमासान युद्ध सुरू आहे. येथून भाजपतर्फे ललीत बाळबुद्धे, काशिम जमा कुरेशी, उमाकांत ढेंग़े, प्रदीप मस्के व खुशाल नाकाडे यांनी उमेदवारी मागितली. ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी जागा राखीव असल्यामुळे सर्वाधिक चढाओढ येथे दिसून येते. बाहेरची ‘पार्सल’ या गटात नको अशी भूमिका भाजपच्या ललीत बाळबुद्धे, खुशाल नाकाडे यांनी यापूर्वीच घेतली. तसे पत्रकही परिसरात वाटप केले. त्यांच्या दुदैवाने खुशाल नाकाडे यांचे नामनिर्देशन पत्र अस्विकृत करण्यात आले. सर्वसाधारण जागेवर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराची वर्णी लागावी यासाठी कुरेशी यांनी उमेदवारी दाखल केली. उमाकांत ढेंगे हे ना.बडोले यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या उमेदवारीला त्या क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांचाच विरोध आहे. त्यामुळे येथे कुणाला उमेदवारी द्यायची हे चित्र धुसर आहे. येथे कुणालाही उमेदवारी दिली तरी असंतुष्टाची संख्या भरपूर असणार आहे.
महागाव जि.प. गटासाठी भाजपतर्फे प्रभाकर कोवे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. येथे पं.स. सभापती तानाजी ताराम यांनी सुद्धा भाजपतर्फे उमेदवारी दाखल केली. येथील भाजपचे पं.स. सदस्य जागेश्वर भोगारे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल करुन सर्वांना आश्चर्यचकित केले. इतर ठिकाणी गटाबाहेरचा उमेदवार चालत असेल तर मला उमेदवारी का नाही, ही भूमिका स्विकारुन ताराम यांनी अर्ज दाखल केला आहे.

Web Title: BJP's 'Agneeparikshan' for four seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.