भाजप जिल्हा कार्यालयात एकच जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:04 AM2019-05-24T00:04:44+5:302019-05-24T00:05:13+5:30
जसजशी निकालाची उत्कंठा वाढत होती तसतसा भाजप कार्यकर्त्यांचा उत्साही ओसंडून वाहत होता. पहिल्या फेरीपासूनच भाजप गोटात उत्साह दिसून आला. भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जसजशी निकालाची उत्कंठा वाढत होती तसतसा भाजप कार्यकर्त्यांचा उत्साही ओसंडून वाहत होता. पहिल्या फेरीपासूनच भाजप गोटात उत्साह दिसून आला. भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. फटाक्यांची आतषबाजी अन् ढोलताशांच्या गजरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
गुरूवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. जवळपास ३२० कर्मचारी मतमोजणीसाठी येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या केंद्रात उपस्थित होते. शाळाबाहेरील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी सकाळीच बंद करण्यात आला होता. शास्त्री चौकातून वाहतूक व्यवस्था वळविण्यात आल्यानंतर शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना निकाल ऐकण्यासाठी दसरा मैदानात सोय करण्यात आली होती.
विशेषत: पक्ष कार्यकर्त्यांची गर्दी मतमोजणी परिसरात होऊ नये याची काळजीही क्षणोक्षणी घेतली जात होती. पहिला फेरीचा निकाल जवळपास नऊ वाजता बाहेर कळताच भाजप कार्यकर्त्यांचे चेहेरे प्रफुल्लीत व्हायला सुरूवात झाली होती.
जलाराम चौकातील सभागृहात एकत्रित आलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी उमेदवार सुनील मेंढे हेही उ्स्थित होते. उपस्थितांनी सुनील मेंढे यांना पेढा भरवित घोषणा दिल्या. गुलालाची उध1ळण व हरातुऱ्यांनी मेंढे यांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.
अशीच स्थित राजीव गांधी चौक परिसरात असलेल्या भाजपच्या जिल्हा कार्यालयात बघावयास मिळाली. सदर कार्यालय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जनसंपर्क कार्यालय सुद्धा आहे.दुसरीकडे भंडारा शहरातील जलाराम सभागृहात सुनील मेंढे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार बाळा काशीवार, आमदार चरण वाघमारे, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, मेंढे यांच्या पत्नी शुभांगी मेंढे, भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असा वाढत गेला कार्यकर्त्यांचा उत्साह
आमचा उमेदवार निवडून येणारच अशी ग्वाही देत कार्यकर्त्यांनी आनंदही व्यक्त केला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येत होता. मात्र जोपर्यंत अंतिम निकाल हाती येत नाही, तोपर्यंत सर्वांनी निकाल घोषणेची वाट बघावी, असेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे रणरणत्या उन्हाच्या फटक्यानेही नागरिकांनी घराबाहेर निघण्याचे टाळले. सायंकाळी ५ वाजतानंतर मात्र शास्त्री चौकात चांगलीच गर्दी दिसून आली.