सत्तेत असल्यास संवादयात्रा ही भाजपची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:19 PM2019-08-05T23:19:09+5:302019-08-05T23:19:51+5:30
विरोधी पक्षात असले की जनतेकरिता संघर्ष करायचा व सत्ता पक्षात असले की जनतेशी संवाद करायचा ही परंपरा भाजपने स्वीकारली आहे. आमची जनादेश यात्रा निघाली आहे. यात्रा देवतांची काढली जाते. मतदारराजाच आमचं दैवत असून त्यांना भेटण्यासाठी आलो आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : विरोधी पक्षात असले की जनतेकरिता संघर्ष करायचा व सत्ता पक्षात असले की जनतेशी संवाद करायचा ही परंपरा भाजपने स्वीकारली आहे. आमची जनादेश यात्रा निघाली आहे. यात्रा देवतांची काढली जाते. मतदारराजाच आमचं दैवत असून त्यांना भेटण्यासाठी आलो आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणावर महाजनाधार यात्रेनिमित्त रविवारी (दि.४) आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके, आमदार राजकुमार बडोले, खासदार सुनील फुंडे, आमदार विजय रहांगडाले, आमदार बाळा काशिवार, आमदार संजय पुराम, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, उपेंद्र कोठेकर, विरेंद्र अंजनकर, अरविंद शिवणकर, काशीम जमा कुरेशी, प्रकाश गहाणे, दिपक कदम, डॉ. गजानन डोंगरवार, गिरीधर हत्तीमारे, विजय बिसेन, मुकेश जायस्वाल उपस्थित होते.
पुढे बोलताना फडणवीस यांनी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की आपण जनतेचे सेवक आहोत. सेवेचा भाव असला पाहिजे, राजाचा नको. ज्या जनतेने निवडून दिले त्यांची सेवा करा आणि पाच वर्षांनंतर आपण काय केलं ते मांडा व जनतेचा जनाधार प्राप्त करा. आम्ही कुणाच्या विरोधात निवडणूक लढतो ते कुणी समोरच दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांनी निवडणुकी आधीच आपला पराभव स्वीकारलेला आहे. विरोधी पक्ष निवडणुकीपूर्वी आंदोलन करतात.
आमचा विरोधी पक्ष आंदोलन करायला तयार नाही. या सरकारने एवढं दिल, तुम्ही काय दिल अशी विचारणा होईल या भीतीपोटी आंदोलनच करीत नाही. २२-२३ मित्रपक्ष एकत्र आले व त्यांनी ईव्हीएम प्रणाली विरु द्ध आंदोलन छेडल. ईव्हीएम म्हणजे ‘एव्हरीबडी व्होटेड फॉर मोदी’ अस त्यांना वाटतं. ते मोदींजींना एवढे घाबरून गेले की त्यांना काय करावं कळतच नाही. विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली पण पेंडालचे पेंडाल रिकामे राहू लागले. स्टेजवर अधिक व खाली कमी अशी बिकट अवस्था संघर्ष यात्रेची झाली. शेवटी यात्रा काढणं बंद करून ते आता ईव्हीएमच्या मागे लागले असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी त्यांनी तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या विभागाच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन केले. शेतकऱ्यांविषयी बोलताना ते म्हणाले, हे सरकार सदैव शेतकऱ्यांसोबत राहिले आहे. दुष्काळ, मावातुडतुडा, पीकविमा, गारपीट, कर्जमाफी व संकटाच्या वेळी शासनाने मदत केली आहे. काँग्रेसने दिलेल्या फसव्या कर्जमाफीसारखी आम्ही कर्जमाफी दिली नाही. काँग्रेसने १५ वर्षात २० हजार कोटी दिले, आम्ही पाच वर्षात ५० हजार कोटी रु पये शेतकºयांना दिले.
निवडणुका तोंडावर बघून काँग्रेस धानाला बोनस घोषीत करायचे. आम्ही सतत पाच वर्ष दिले. पुढच्या वर्षी पण ५०० रु पये प्रति क्विंटल बोनस देऊ. त्यांनी आपल्या भाषणातून मागील पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा मांडतांना शेतकºयांचे वीज कनेक्शन, सिंचन प्रकल्प, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, उद्योग निर्मिती, रोजगार, शिक्षण, आरोग्य, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, ओबीसींचे उत्थान यांची विस्तृत माहिती दिली.
गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने दुप्पट काम केल्याचे ते महाजनाधार यात्रेत सांगत आहेत. यासंदर्भात त्यांचेशी कुठल्याही व्यासपीठावर वादविवाद करायला तयार असल्याचे आवाहन माजी खा. नाना पटोले यांनी स्वीकारले. या विधानावर आगपाखड करत साकोलीचे आ. बाळा काशीवार यांनी, मुख्यमंत्र्यांना काय आवाहन देता, याच मंचावर उद्या मी नाना पटोलेंशी वादविवाद करायला तयार आहे. त्यांनी आमदारकीच्या १५ वर्षात काय केले? कोणती विकास कामे केली?ते सांगावे. मी व फडणवीस सरकारने गेल्या साडेचार वर्षात काय केलं ते सांगतो. नाना पटोले यांनी माझे आवाहन स्वीकारावे.
- बाळा काशिवार
आमदार, साकोली विधानसभा क्षेत्र
.................................
पाच वर्षापूर्वी राज्यात सत्तारुढ आघाडी शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी काहीच केल नाही. म्हणून केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी जनताजनार्दनासमोर येऊन बोलण्याची त्यांची हिम्मत झाली नाही. फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षात अनेक लोकाभिमूख कामे केली. आदिवासींसाठी कामे करणारे हे पहिले सरकार आहे व लोकांसमोर केलेल्या कामांचा हिशेब मांडणारा हा पहिलाच मुख्यमंत्री आहे.
- संजय पुराम
आमदार, आमगाव विधानसभा क्षेत्र
.................................
साडेचार वर्षात फडणवीस सरकारने लोकहिताची कामे केली. लोकांचे प्रश्न आस्थेने सोडविले. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून बहुसंख्य खासदार निवडून आले. फडणवीस सरकारने सतत पाच वर्षे २०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना बोनस दिला. समाजातील सर्वच घटकांचे प्रश्न सोडविले. पर्यटन स्थळांचा विकास केला. सिंचन प्रकल्प मार्गी लावले. मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे केली. इंदूमिलच्या जागेचा प्रश्न सोडविला. नॉन क्रिमिलिअरची मर्यादा वाढविली. महा समाधान शिबिराच्या माध्यमातून ७२ हजार लाभार्थ्यांना लाभ दिला. दिव्यांगांना साहित्य वाटप करुन स्वावलंबी बनविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.
-राजकुमार बडोले
आमदार, अर्जुनी मोरगाव