भाजपचे गावोगावी कोरोनासंबंधी सेवाकार्य आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:28+5:302021-05-30T04:23:28+5:30
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आघाडीच्या केंद्र सरकारला ३० मे रोजी ७ वर्षे पूर्ण ...
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आघाडीच्या केंद्र सरकारला ३० मे रोजी ७ वर्षे पूर्ण होत असून, त्या दिवशी भाजप जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये कोरोनासंबंधी सेवाकार्य करणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष केशव मानकर यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता कोणताही उत्सव होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष मानकर यांनी जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये ३० मे रोजी भाजचे कार्यकर्ते भेट देतील. त्या गावांमधील आशा सेविका आणि कोरोना साथीचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात येईल. गावांमध्ये भाजपचे कार्यकर्ते कोरोनासंबंधी सेवाकार्य करतील. जिल्ह्यातील भाजपचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह सर्व कार्यकर्ते सेवाकार्यात सहभागी होतील. पक्षातर्फे कोरोनाच्या संकटात सातत्याने सेवाकार्य सुरू आहे. पक्षातर्फे ३० मे चा दिवसही विशेष सेवाकार्य करून साजरा करण्यात येणार आहे. कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून आणि प्रशासनाला सहकार्य करून हा उपक्रम होईल. आघाडी व मोर्चे रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार आहेत, तसेच जिल्ह्यातील सेवावस्त्यांमध्ये विशेष सेवाकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल नुकतीच पक्षाची राज्यस्तरीय ऑनलाइन बैठक झाली. त्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार यंदा मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष सेवाकार्य करण्यात येणार आहे.