निकृष्ट रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:34 AM2021-08-25T04:34:23+5:302021-08-25T04:34:23+5:30
गोरेगाव : तालुक्यातील कुऱ्हाडी-पिंडकेपार रस्ता बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून, बांधण्यात आलेला रस्ता निकृष्ट व निम्न दर्जाचा आहे. ...
गोरेगाव : तालुक्यातील कुऱ्हाडी-पिंडकेपार रस्ता बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून, बांधण्यात आलेला रस्ता निकृष्ट व निम्न दर्जाचा आहे. या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत असून, रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून या कार्यात सहकार्य करणाऱ्या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. या विरोधात शुक्रवारी (दि.२७) जिल्हा परिषदेवर मोर्चा व निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.
वार्षिक नियोजनांतर्गत १५ ऑगस्ट २०२० रोजी तालुक्यातील कुऱ्हाडी-पिंडकेपार रस्ता बांधकामासाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आला. हे बांधकाम जुलै २०२१ पर्यंत पूर्ण झाल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कंत्राटदाराने हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा तयार केला आहे. एका महिन्यात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, या डांबरी रस्त्यावर डांबराचा पत्ताच नाही अशी स्थिती आहे. रस्त्याच्या कडेला मुरूम न टाकता मातीच टाकली आहे. यामुळे रस्ता बांधकामाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी भाकपने केली आहे.