रक्तस्त्रावाने बाळंतिणीचा मृत्यू
By admin | Published: May 7, 2017 12:15 AM2017-05-07T00:15:02+5:302017-05-07T00:15:02+5:30
गोरेगाव तालुक्याच्या कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या एका गर्भवती महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला.
डॉक्टरांचा हलगर्जीपणा?: प्रसूतीदरम्यान नाळ निघाला नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या एका गर्भवती महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (दि.५ ) रोजी दुपारी गोंदियाच्या आयुष क्रिटीकल हॉस्पीटलमध्ये घडली. अनिता सुखराम पटले (२३) रा. सोनेगाव ता. गोरेगाव असे मृत बाळंतिणीचे नाव आहे.
गोरेगाव तालुक्याच्या कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सोनेगाव येथील अनिता पटले ही महिला गर्भवती असल्याने १८ एप्रिल रोजी तिच्या पोटात दुखू लागल्याने कन्हारटोली येथील डॉ. मेघा रत्नपारखी यांच्याकडे उपचार घेण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांनी या महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाला आहे, असे सांगितले. त्यानंतर ते घरी गेल्या. पुन्हा २६ एप्रिलला त्यांना उलट्या होऊ लागल्याने पुन्हा त्या डॉ. रत्नपारखी यांच्याकडे गेल्यावर त्यांनी त्यांना केएमजे हॉस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला.
२७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता केएमजे हॉस्पीटल येथे दाखल करून तिची सामान्य प्रसूती केली. परंतु तिच्या पोटातील प्लासंटा निघाला नाही. त्यामुळे थोड्या प्रमाणात चिरा लावल्याने तिला रक्तस्त्राव झाला. सतत सुरू असलेल्या रक्तस्त्रावामुळे प्रकृती नाजूक झाली. परिणामी तिला त्यामुळे तिला डॉक्टरांनी नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला.
अनिताला नागपूर येथील डॉ.बारोकर यांच्या आदित्य हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. ४ मे पर्यंत अनिताला तेथे उपचार देण्यात आला. परंतु प्रकृती नाजूक असल्याने तेथील डॉक्टरांनी घरी नेण्याचा सल्ला दिला. त्यावर ५ मे रोजी तिला घरी न नेता गोंदियाच्या आयुष क्रिटीकल या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दुपारी तिचा मृत्यू झाला. परंतु तेथील डॉक्टरांनी मृत घोषित न करता बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. गंगाबाई स्त्री रूग्णालयात आणल्यावर तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर गोरेगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नाकाडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना भेट दिली.
अनिता संदर्भात डॉक्टरांचा असा सल्ला
डॉ. मेघा रत्नपारखी यांनी बाळ पोटातच मृत असल्याचे सांगून केएमजे हॉस्पीटल मध्ये उपचार करण्याचा सल्ला.
केएमजे हॉस्पीटलमध्ये सामान्य प्रसूती झाल्यानंतर अधिकरक्तस्त्राव झाल्याने नागपूरच्या डॉ.बारोकर यांच्या रूग्णालयात हलविण्याचा सल्ला.
नागपूरच्या आदित्य हॉस्पिटल येथील डॉ. बारोकर यांनी तिला रक्ताच्या गाठी झाल्या आहेत. अधिक रक्तस्त्रावाने किडनी निकामी झाली, संसर्ग झाला आहे.मेंदूने काम करणे बंद केल्याचे अहवालात म्हटले.
आयुष क्रिटीकलचे डॉ. गुप्ता यांनी तिला मृत घोषित न करता गंगाबाईत नेण्याचा सल्ला दिला.