रिक्त पदांनी मोडले आरोग्य सेवेचे कंबरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 10:15 PM2018-08-09T22:15:43+5:302018-08-09T22:16:20+5:30
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ ला झाली व गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्याचा समावेश झाला. १९ वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतरही अर्जुनी-मोरगाव तालुकावासीयांना पुरेशी आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. तालुका अधिकारी कार्यालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांना रिक्त पदांचे ग्रहण लागले असल्याने आरोग्य सवेचे कंबरडे मोडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इसापूर : गोंदिया जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ ला झाली व गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्याचा समावेश झाला. १९ वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतरही अर्जुनी-मोरगाव तालुकावासीयांना पुरेशी आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. तालुका अधिकारी कार्यालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांना रिक्त पदांचे ग्रहण लागले असल्याने आरोग्य सवेचे कंबरडे मोडले आहे.
तालुक्यात पंचायत समितीस्तरावर असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासह अन्य ६ प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण १४८ मंजूर पदापैकी १०८ पदे भरली असून ४० पदे रिक्त आहेत. परिणामी तालुक्यातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. आरोग्य सेवेसारख्या ज्वलंत समस्येवर स्वत:ला राजकारणी समजून जनसेवेचा आव आणणारे लोकप्रतिनिधी रिक्त पदे भरण्यासाठी कोणते प्रयत्न केले असा संतप्त सवाल तालुकावासीयांनाकडून केला जात आहे.
तालुक्यातील महालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माताचे पद रिक्त आहे. आरोग्य सेवकाच्या ६ पदापैकी ३ पद रिक्त आहेत. तसेच कनिष्ठ सहायक व वाहन चालकाचे प्रत्येकी १ पद मंजूर असून ते रिक्त आहे. कोरंभीटोला केंद्रात औषध निर्माता २ पदे मंजूर असून १ पद रिक्त आहे. आरोग्य सहायक (स्त्री) १ पद मंजूर असून ते रिक्त आहे. आरोग्य सेविकांची १० पदे मंजूर असून ५ पदे रिक्त आहेत. तसेच आरोग्य सेवकांची ७ पदे मंजूर असून ३ पदे रिक्त आहेत. वाहन चालकाचे १ पद मंजूर असून तेही रिक्त आहे.
चान्ना-बाक्टी येथील केंद्रात औषध निर्मातापद रिक्त आहे. आरोग्य सेविकेची ९ पैकी पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवकांची ५ पैकी २ पदे रिक्त आहेत. कनिष्ठ सहायकाचे पद रिक्त असून परिचरांचे ५ पैकी १ पद रिक्त आहेत. वाहन चालकाचेही पद रिक्त आहे. गोठणाव केंद्रात औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे पद रिक्त आहे. आरोग्य सेविकांच्या ५ पैकी १ पद रिक्त आहे. आरोग्य सेवकांचे एक पद रिक्त आहे. वाहन चालकाचेही पद रिक्त आहे. धाबेपवनी केंद्रात आरोग्य सेविकेची २ तर आरोग्य सेवकांचीही २ पदे रिक्त आहेत. परिचर वाहन चालकाचे प्रत्येकी १ पद रिक्त आहे. येथील केशोरी केंद्रात औषध निर्माता हे पद रिक्त आहे. आरोग्य सेविका, परिचर व वाहन चालकाचे प्रत्येकी १ पद रिक्त आहे.
एकंदरीत अर्जुनी-मोरगाव तालुक्यात आरोग्य सेवेत औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहायक (स्त्री), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, कनिष्ठ सहायक, परिचर, वाहन-चालक या १४८ पदांची मंजुरी असून ४० पदे रिक्त असल्याने तालुक्यातील खेडेगावातील जनतेला आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी आहे.
पालकमंत्र्यांच्या क्षेत्रातच अंधार
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत तालुकास्तरावर तालुका संनियंत्रण व सल्लागार समिती असते. या समितीच्या अध्यक्षपदी खुद्द सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले तर उपाध्यक्षपदी सभापती अरविंद शिवणकर, सचिव पदावर डॉ. विजय राऊत तर सदस्य म्हणून सर्व जि.प. सदस्य, सर्व पं.स.सदस्य आहेत. खुद्द बडोले हे अध्यक्षपदी असूनही तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.