रस्त्यावरील खड्ड्यांसाठी आमगाववासीयांचे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 05:00 AM2021-06-25T05:00:00+5:302021-06-25T05:00:02+5:30
अर्धवट रस्ता बांधकामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. दोन दिवसांपूर्वीच या मार्गावर एका महिलेचा बळी गेला, तर आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कंत्राटदाराला रस्त्याचे काम त्वरित सुरू करून खड्डे बुजविण्याची विनंती नागरिकांनी अनेकदा केली; पण त्याची कंत्राटदाराने दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आमगाववासीयांनी गुरुवारी सकाळी या मागणीला घेऊन कामठा ते लांजी मार्गावर आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : मागील चार महिन्यांपासून आमगाव-देवरी मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता बांधकामासाठी कंत्राटदाराने ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने अपघातांची शक्यता बळावली आहे. वांरवार खड्डे बुजविण्याची मागणी करूनसुद्धा कंत्राटदाराने लक्ष न दिल्याने आमगाव येथील नागरिकांनी गुरुवारी (दि. २४) कामठा ते लांजी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास एक ते दीड तास हे आंदोलन सुरू होते. तहसीलदारांनी रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आमगाव-देवरी मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम मागील चार महिन्यांपासून शिवालया कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र, या कंपनीने रस्त्याचे काम सलग न करता तुकड्या तुकड्यांत केले आहे. त्यातच या मार्गावर ठिकठिकाणी अर्धवट काम केले असल्याने आणि त्यासाठी खड्डे खोदून ठेवल्याने या मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत.
शिवाय अर्धवट रस्ता बांधकामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. दोन दिवसांपूर्वीच या मार्गावर एका महिलेचा बळी गेला, तर आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कंत्राटदाराला रस्त्याचे काम त्वरित सुरू करून खड्डे बुजविण्याची विनंती नागरिकांनी अनेकदा केली; पण त्याची कंत्राटदाराने दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आमगाववासीयांनी गुरुवारी सकाळी या मागणीला घेऊन कामठा ते लांजी मार्गावर आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दंगा नियंत्रण पथकालासुद्धा घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, तहसीलदार दयाराम भोयर यांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलकांची समजूत काढली. तसेच शिवालया कंपनीच्या कंत्राटदाराला त्वरित कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले.
त्यांनी त्वरित खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे आंदोलक शांत झाले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय बहेकार, भारतीय विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजीव फुंडे, शंभू प्रसाद अग्रिका, पोलीस निरीक्षक व्ही. के. नाळे यांनी मध्यस्थाची भूमिका पार पडली. आंदोलनात सुरेश बोपचे, सुरेश उपलपवार, मुकेश अग्रवाल, बी. एल. बोपचे, कैलाश गौतम, सुशील पारधी, छत्रपाल मच्छिया, शालिकराम येळे, रामेश्वर नागपुरे, शिवाजी वलथरे, शिव लिल्हारे, सुखराम कटरे, नरेश ठाकरे, संजय बरय्या, विजय बरय्या, शुभम गुप्ता, श्रावण शिवणकर, नथूलाल गौतम, गोपाल अग्रवाल, दुर्गेश येटरे, बालू येटरे, विलास टेंभरे, अजय दोनोडे, आदी सहभागी झाले होते.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात
आमगाव येथील रस्त्यावरील खड्ड्यांचे वृत्त गुरुवारी प्रकाशित होताच आमगाववासीयांनी याची दखल घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला. दीड तासाच्या रास्ता रोको आंदोलनानंतर कंत्राटदाराने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला त्वरित सुरुवात केली. त्यामुळे आमगाव शहरवासीयांना दिलासा मिळाला.